नवी दिल्ली :चार डिसेंबर हा दिवस आपण 'भारतीय नौदल दिन' म्हणून साजरा करतो. यावर्षी नौदल दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नौदलातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.
भारतीय नौदल हे निर्भिडपणे देशाच्या सागरी तटांची रक्षा करते, तसेच संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठीही धावून जाते. आपल्या देशाला कित्येक वर्षांचा आरमार दलाचा इतिहास आहे. नौदल दिनाच्या सर्व नौदल जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा, अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले होते. तर, नौदलातील जवानांच्या धाडसाला आणि देशभक्तीला माझा सलाम, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
ऑपरेशन ट्रायडंट..
1971 साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडंट. 4 डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून आजच्या दिवशी भारतीय नौसेना 'नेव्ही डे' साजरा करते.
इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून भारतीय नौदलाची सुरूवात झाली. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.
हेही वाचा :'शेतकरी आंदोलनाचा सरकारवर दबाव, किमान आधारभूत किमतीवर सकारात्मक चर्चा'