भटिंडा (पंजाब) :सिद्धू मूसेवाला खून प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई आरोपी आहे. त्याला नुकतेच दिल्लीतील तिहार जेलमधून पंजाबच्या भटिंडा येथील तुरुंगात आणण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई याने मंगळवारी एका खासगी वाहिनीला थेट मुलाखत दिली आहे. यानंतर आता कारागृह व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या मुलाखतीमुळे पंजाबच्या तुरुंगातील कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लॉरेन्स बिश्नोईने केला खुलासा :सिद्धू मुसेवालाच्या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे बिश्नोईने सांगितले. मला सिद्धू आवडत नव्हता, कारण त्याने काँग्रेस पक्षातील सत्तेचा वापर करून माझ्या अनेक सहकाऱ्यांवर कारवाई केली, असे तो म्हणाला. बिश्नोई म्हणतो की, त्याला संपूर्ण हत्येच्या कटाची माहिती होती, पण त्याने त्यात कोणतीही भूमिका बजावली नाही. गोल्डी ब्रार याने हे सर्व केले आहे. बिश्नोई याने असा युक्तिवाद केला की, विकी मिधूखेरा आणि गुरलाल ब्रार यांचे त्यांच्या मृत्यूपूर्वी सिद्धू मूसेवाला याच्याशी कोणतेही वैर नव्हते. तो म्हणाला की, या आधीही तो सिद्धूची हत्या करू शकला असता. तथापि, सिद्धूशी त्याचे वैर विक्की मिदुखेरा आणि गुरलाल ब्रार यांच्या हत्येनंतरच झाले, कारण सिद्धू मूसवाला त्यांच्या हत्येत सामील होता. लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, लोक आम्हाला गुन्हेगार आणि सिद्धूला समाजसेवक म्हणून संबोधत आहेत. तो म्हणाले की सिद्धूने देशासाठी कोणते काम केले आहे किंवा अमली पदार्थ तस्करांविरोधात आवाज उठवला आहे हे आम्हाला सांगितले पाहिजे. सिद्धूमुळे त्याच्या भावांचाही मृत्यू झाल्याचे तो म्हणाला. सिद्धूला स्वतःला गुंड बनायचे होते. या प्रकरणाची चौकशी का झाली नाही?, असेही तो म्हणाला.