मंड्या (कर्नाटक): यंदाच्या 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटक काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. KPCC प्रमुख डीके शिवकुमार मंगळवारी श्रीरंगपटणा येथे त्यांच्या पक्षाच्या राज्यव्यापी 'प्रजा ध्वनी यात्रे' दरम्यान मंड्या जिल्ह्यातील बेविनाहल्लीजवळ कलाकारांवर 500 रुपयांच्या नोटा फेकताना दिसले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या डी के शिवकुमार यांनी अशा प्रकारे कलाकारांवर पाचशेच्या नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे.
प्रजा ध्वनी यात्रा :श्रीरंगपट्टणा विधानसभा मतदारसंघात आज सुरू असलेल्या यात्रेत विरोधी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्साही आहेत आणि सक्रिय सहभाग घेत आहेत. केपीसीसी अध्यक्ष शिवकुमार यांचे त्यांच्या अनुयायांनी द्राक्षांच्या हाराने स्वागत केल्यावर कटुंगेरे गावातून यात्रेला सुरुवात झाली. माजी आमदार बंदिसिद्धे गौडा यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात प्रजा ध्वनी यात्रा काढण्यात आली. यावेळी, डीके शिवकुमार कलाकारांवर पैसे फेकताना एक व्हिडिओ समोर आला आहे. रोड शोमध्ये सहभागी झालेल्या लोककलाकारांवर प्रचाराच्या बसच्या वर उभ्या असलेल्या ठिकाणाहून ५०० रुपयांच्या नोटा फेकण्यात आल्याचा आरोप असून, हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.