बंगळुरू- काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांनी जोरात थप्पड लगावली आहे. माध्यमातील वृत्तानुसार शिवकुमार हे मंड्यामध्ये माजी मंत्री जी. मंडेगौडा यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. तेव्हा ही घटना घडली आहे.
डी. के. शिवकुमार यांच्यासोबत पक्षाचे कार्यकर्ते चालत असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. चालत असताना एका कार्यकर्त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरा कार्यकर्ता सेल्फी घेत होता. त्यावर संतापलेल्या डी. के. शिवकुमार यांनी खांद्यावर हात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याला जोरात थप्पड मारली. नीट वागा, असेही कार्यकर्त्याला सुनावले. थप्पड मारत असल्याचा व्हिडिओ कार्यकर्त्यांनी मोबाईलमधून काढून टाकण्याची सूचनाही शिवकुमार यांनी दिली होती. पण, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाक्षध्यक्ष कार्यकर्त्याला थप्पड मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हेही वाचा-महिलेशी गैरवर्तणूक; मुख्यमंत्री योगी यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन
सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने संताप
शिवकुमार म्हणाले, की सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नव्हते. त्यामुळे रागावल्याचे त्यांनी स्पष्टीकरण केले. पक्ष कार्यकर्त्यांनी योग्य वागावे अन्यथा सार्वजनिक ठिकाणी असे वागितल्यास पक्षाची प्रतिमा खराब होऊ शकते, असे मत व्यक्त केले.