चंदीगड Khalistani Attacked On Embassy : केंद्र सरकारनं परदेशात देशविरोधी कार्य करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांवर कारवाई करणं सुरू केलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) इंग्लंड आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासांवर हल्ला करणाऱ्या १५ खलिस्तानींची ओळख पटवली आहे. शिख फॉर जस्टिसचा सदस्य हरदीपसिंग निज्जर याची या वर्षी कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर संतप्त खलिस्तानींनी परदेशातील भारतीय दूतावासांना लक्ष्य केलं होतं.
हल्ले केव्हा झाले :या वर्षी २ जुलै रोजी खलिस्तानी समर्थकांनी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासाच्या इमारतीत घुसून आग लावली होती. सुदैवानं या घटनेत कोणीतीही जीवितहानी झाली नाही. याशिवाय १९ मार्च रोजी ४५ खलिस्तान समर्थकांनी इंग्लंडमधील भारतीय दूतावासावर हल्ला केला होता. केंद्रातील मोदी सरकारनं या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता.
एनआयएची टीम कॅनडाला जाणार : एनआयएनं हल्ला करणाऱ्या १५ खलिस्तानी समर्थकांची ओळख पटवली असल्याचं समजतं. या संदर्भात केंद्रीय तपास यंत्रणेचं एक पथक पुढील महिन्यात कॅनडाला जाणार आहे. ही टीम सर्व खलिस्तानी समर्थकांची ओळख पटवून स्थानिक सरकारशी संवाद साधून हल्लेखोरांविरुद्ध लुकआउट परिपत्रक जारी करेल.