त्रिशूर (केरळ) : केरळमधील एक 17 वर्षीय मुलगी भारतातील सर्वात तरुण अवयव दाता ठरली आहे. तिने आपल्या लिव्हरचा काही भाग वडिलांना दान केला. देशातील कायदा अल्पवयीनांना अवयव दान करण्यास परवानगी देत नसल्याने बारावीत शिकणाऱ्या या मुलीने केरळ उच्च न्यायालयाकडे यासंबंधी परवानगी मागितली होती.
तंदुरुस्तीसाठी आहारात बदल : न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर तिने तिच्या आजारी वडीलांना वाचवण्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी आपल्या लिव्हरचा काही भाग दान केला. केरळच्या त्रिशूरमध्ये कॅफे चालवणारे 48 वर्षीय तिचे वडील यकृताच्या आजाराने त्रस्त होते. तिने दान करण्यापूर्वी स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपला आहार बदलला. तसेच आपल्या लिव्हरचा भाग दानासाठी सर्वोत्तम स्थितीत असल्याची खात्री करण्यासाठी जिममध्ये देखील प्रवेश घेतला होता.
मुलीची तब्बेत उत्तम : अलुवा येथील राजगिरी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलीने आपल्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी लढलेल्या न्यायालयीन लढाईनंतर रुग्णालयाने त्यांच्या शस्त्रक्रियेचा खर्च माफ केला. तिला एका आठवड्याच्या मुक्कामानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ती तिच्या या कार्याने आनंदी असून सध्या तिला आरामदायी वाटत असल्याचे तिचे म्हणणे आहे. वडिलांना यकृताच्या आजारासोबतच कॅन्सरचाही आजार निष्पन्न झाला होता. मात्र त्यांना योग्य दाता न मिळाल्याने त्यांच्या मुलीनेच आपल्या लिव्हरचा काही भाग वडिलांना दान करण्याचा निर्णय घेतला.