तिरुअनंतपुरम/नवी दिल्ली : केरळमधील कलामासेरी येथे रविवारी (२९ ऑक्टोबर) प्रार्थना सभेदरम्यान झालेल्या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी संवाद साधला. अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बॉम्बस्फोटाचा तपास करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) आणि राष्ट्रीय तपास संस्था (NIA) एर्नाकुलमला पोहोचल्या आहेत. या घटनेनंतर आता संपूर्ण भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
गैर-मुस्लिम समुदायांवर हल्ल्याचे अलर्ट : एर्नाकुलममधील बॉम्बस्फोटांमागे कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद्यांचा हात असल्याचं प्राथमिक अहवालात म्हटलं जातंय. यानंतर सुरक्षा यंत्रणांना देशातील ज्यू लोकवस्ती असलेल्या भागात गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी केरळ सरकारला गैर-मुस्लिम समुदायांवर संभाव्य हल्ल्यांबाबत तीन अलर्ट दिले आहेत. येथे नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, खलिस्तान समर्थक रॅलीला पाठिंबा देण्यासाठी हमासचे माजी प्रमुख खालेद मेशाल केरळच्या मलप्पुरममध्ये दिसल्यानंतर हे स्फोट झाले.
राजधानी दिल्लीतील सुरक्षा वाढवली : केरळमधील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी झालेल्या स्फोटानंतर राजधानी दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमधील चर्च आणि मेट्रो स्थानकांभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, मुख्य बाजारपेठा, चर्च, मेट्रो स्टेशन, बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया : या घटनेवर शोक व्यक्त करताना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं. 'आम्ही घटनेची माहिती गोळा करत आहोत. सर्व उच्च अधिकारी एर्नाकुलममध्ये आहेत. आम्ही या घटनेला गांभीर्यानं घेतलंय. मी डीजीपीशी बोललो. तपासानंतर अधिक माहिती मिळू शकेल', असं ते म्हणाले. दरम्यान, तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी या बॉम्बस्फोटाचा निषेध केला असून, या घटनेनं मी हैराण आणि निराश झालो, असं ते म्हणाले. या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याची मागणी शशी थरूर केली आहे.
हेही वाचा :
- Explosion in Zamra International Convention Centre : केरळच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट; एक ठार, अनेक जखमी