शिवमोग्गा (कर्नाटक) : काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले की, घाबरलेल्या कॉंग्रेसने आता आपल्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना कर्नाटकात प्रचारासाठी आणले आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांचे नाव न घेता मोदी येथे एका निवडणूक सभेत म्हणाले की, 'काँग्रेस आता इतकी घाबरलेली आहे की, तेव्हा जे प्रचारात सहभागी नव्हते त्यांना येथे आणले जात आहे. काँग्रेसने पराभवाची जबाबदारी एकमेकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे'. सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणास्तव 2019 लोकसभा निवडणुकीपासून प्रचार आणि सार्वजनिक सभांपासून दूर होत्या. शनिवारी हुबळी येथे त्यांनी त्यांच्या पहिल्या निवडणूक रॅलीला संबोधित केले.
'2 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन खोटे' :कर्नाटकातील खासगी क्षेत्रात दरवर्षी दोन लाख नोकऱ्या देण्याचे काँग्रेसचे आश्वासन खोटे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले. कोविड - 19 महामारी असूनही राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारने गेल्या साडेतीन वर्षांत दरवर्षी राज्यातील 13 लाखांहून अधिक लोकांना औपचारिक नोकऱ्या दिल्या आहेत, असा दावा त्यांनी केला. 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवमोग्गा येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, काँग्रेसने खोटे पसरवण्याची व्यवस्था केली आहे, परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी निवडणुकीवर त्याचा काही परिणाम होणार नाही.
'बजरंगबली की जय' घोषणेने भाषणाची सुरुवात : 'बजरंगबली की जय' या घोषणेने भाषणाची सुरुवात करताना मोदी म्हणाले की, ज्या काँग्रेसचे ध्येय भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण आहे ती तरुणांचे भविष्य कधीच घडवू शकत नाही. त्यांनी तरुण मतदारांना म्हटले की, 'तुमच्या आई - वडिलांना किंवा आजी - आजोबांना ज्या त्रासाला सामोरे जावे लागले ते मोदींना नको आहे. मोदींना आता तुमच्या आई - वडिलांना किंवा आजी - आजोबांना येणाऱ्या अडचणी दूर करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढे जाता येईल.