Karnataka Election 2022 : भाजप देशाची संपत्ती लुटण्यात व्यस्त; प्रियंका, राहुल गांधींची जोरदार टीका - प्रियंका गांधी
कर्नाटक विधानसभेसाठी येत्या 10 मे रोजी मतदान आहे. त्यासाठी राज्यात कॉंग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. आज कर्नाटकात पंतप्रधान मोदींचा रोड शो झाला. त्यादरम्यान त्यांनी कॉंग्रेस पक्षावर खरपूस टीका केली. त्यानंतर कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि माजी खासदार राहुल गांधी यांच्या देखील सभा झाल्या. या सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेचा समाचार घेतला.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी
By
Published : May 7, 2023, 9:27 PM IST
मंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटकातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींच्या मते भाजप हे डबल इंजिनचे सरकार आहे. मग मोदींनी सांगावे की दिल्लीच्या इंजिनला 1.5 लाख कोटी रुपयांपैकी किती पैसे मिळाले? चार वर्षांपासून कारवाई का झाली नाही? का कोणी तुरुंगात गेलं नाही? कर्नाटकात एवढा भ्रष्टाचार आहे, पण पंतप्रधान मोदी काहीच करत नाहीत', असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.
'हा कर्नाटकातील खरा दहशतवाद' :काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा रविवारी म्हणाल्या की, भ्रष्टाचार, खंडणी, महागाई आणि बेरोजगारी हा कर्नाटकातील खरा दहशतवाद आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना त्याकडे लक्ष देण्यात अपयशी ठरला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मुदाबिद्री येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्या म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेते निवडणुका जवळ आल्या की नेहमीच अतिरेकी आणि राष्ट्रीय सुरक्षेबद्दल बोलतात.
'राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या' :प्रियांका म्हणाल्या, 'ते लोकांच्या खर्या मुद्द्यांवर बोलत नाहीत. मला भाजप नेत्यांना सांगायचे आहे की, भाजप सरकारमध्ये महागाई, बेरोजगारी आणि 40 टक्के भ्रष्टाचार (कमिशन) हेच खरे अतिरेकी आहेत. त्या म्हणाल्या की, भाजप निवडणुकीच्या वेळी आश्वासने देतो, पण त्यांनी (भाजप) गेल्या तीन वर्षांत कर्नाटकात काय केले? कशाच्या आधारे लोकांनी मतदान केले पाहिजे. त्या म्हणाल्या की, 'धर्म, राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद यावर बोलत असताना भाजपच्या नेत्यांना त्यांच्या राजवटीत कर्नाटकात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं दिसत नाही. राज्यात एक हजाराहून अधिक बेरोजगार तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत'.
'भाजपने 6 लाख कोटींची लूट केली' : भाजप सरकारने आपल्या राजवटीत 6 लाख कोटींची लूट केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नोटाबंदीनंतर आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) चुकीच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील लघु आणि मध्यम उद्योगांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे हजारो तरुण बेरोजगार झाल्याचा दावा त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने सिंडिकेट बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक आणि कॅनरा बँक या चार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण करून बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा उद्देश नष्ट केला. प्रियंका म्हणाल्या की, नवीन मंगळूर बंदरासह देशातील सर्व विमानतळ आणि सागरी बंदरे केंद्रातील भाजप सरकारचे मित्र असलेल्या धनकुबेरांना विकली जात आहेत. अशाप्रकारे हजारो स्थानिकांना रोजगारापासून वंचित ठेवले जात असल्याचे त्या म्हणाल्या. कर्नाटक मिल्क फेडरेशनचा नंदिनी मिल्क ब्रँड गुजरातस्थित अमूलमध्ये विलीन करून भाजप आता त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रियंका गांधींनी केला.
'भाजप देशाची संपत्ती लुटण्यात व्यस्त' :भाजप देशाची संपत्ती लुटण्यात व्यस्त असून महिला विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि तरुणांची बेरोजगारी या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोप प्रियंका यांनी केला. त्या म्हणाल्या की, 'ते सत्तेत असताना लोकांसाठी काम करत नाहीत आणि निवडणुकीच्या वेळी त्यांच्याकडे जाऊन धर्म, दहशतवाद आणि सुरक्षिततेचा प्रचार करतात'. प्रियांका म्हणाल्या की, 'राज्यातील पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या इंदिरा कॅन्टीनसह सर्व लोककल्याणकारी योजना पुन्हा लागू केल्या जातील. तसेच हमीपत्रात दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल, असे त्या म्हणाल्या.
'काँग्रेसने पाच हमी जाहीर केल्या' :कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच हमी जाहीर केल्या आहेत. प्रियांका म्हणाल्या की, छत्तीसगड आणि राजस्थानमधील काँग्रेस सरकारने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकरी आणि पेन्शनधारकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. त्या म्हणाल्या की, काँग्रेस मच्छीमारांसाठी 10 लाख रुपयांची विमा योजना आणणार असून 'स्टँड विथ मोगविरा' अंतर्गत महिला मच्छीमारांना 1 लाख रुपये बिनव्याजी देण्याची योजना आणणार आहेत. राज्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे.