बंगळुरू- कोरोनाच्या संकटात रुग्णांना बेड, औषधे आणि ऑक्सिजन मिळण्यासाठी देशात प्रचंड अडचणी सोसाव्या लागत आहेत. तर अनेक ठिकाणी कोरोनाबाधितांना आर्थिक लुटीलाही व प्रसंगी फसवणुकीलाही सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत कर्नाटकमधील कुमार रुग्णालयाकडून गरीब असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतात. हे रुग्णालय टुमकुरू जिल्ह्यातील तिपतूर शहरामध्ये आहे.
कुमार रुग्णालय हे डॉ. श्रीधर यांच्या मालकीचे आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी 76 बेड आहेत. सध्या येथे 46 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्न दिले जात आहे. बेड, नर्सिंग सेवा, ऑक्सिजनही मोफत पुरविण्यात येत आहे. तर काही औषधेही रुग्णांना मोफत देण्यात येतात.
कोरोनाबाधित रुग्णांना मोफत उपचारांसह जेवण हेही वाचा-निस्वार्थ सेवेला सलाम... पीपीई किटमध्येच नर्स झोपली जमिनीवर
डॉ. श्रीधर यांना भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार असल्याचा अंदाज होता. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच 60 ऑक्सिजन सिलिंडर बेडला बसविलेले आहेत. रुग्णांना तपासताना डॉ. श्रीधर हे केवळ मास्क घालतात. ते पीपीई कीटही वापरत नाहीत. रुग्णांना त्रास घेऊ नका, असे ते आश्वस्त करतात.
हेही वाचा-कॅन्सरग्रस्त चार वर्षीय 'परी'ने जिंकली कोरोना विरुद्धची लढाई
ही पैसे कमविण्याची वेळ नाही-
सर्व कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही. ज्यांना गरज आहे, त्यांनाच रुग्णालयात दाखल केले जाते. तर इतर रुग्णांना घरी विलगीकरणात ठेवण्यात येत असल्याचे डॉ. श्रीधर यांनी सांगितले. पुढे डॉ. श्रीधर म्हणाले, की ही पैसे कमविण्याची वेळ नाही. रुग्णांवर उपचार करणे हे डॉक्टरांचे प्रथम प्राधान्य असायला हवे, असे डॉ. श्रीधर मत व्यक्त करतात.