हसन (कर्नाटक) : कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील अरासेकेरे शहरात आयफोनसाठी एका 23 वर्षीय कुरिअर बॉयची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीचे वय अवघे 20 वर्षे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
असे आले प्रकरण उघडकीस : अरसेकेरे तालुक्याच्या कोपलू रेल्वे फाटकजवळ एका अज्ञात तरुणाचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम हाती घेतले होते. तो तरुण दुचाकीवर बॅग घेऊन जाताना पेट्रोल पंपातील सीसीटीव्हीत कैद झाला होता. पोलिसांनी याचा तपास केला असता हत्येचे गूढ उघड झाले. त्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
आयफोन डिलिव्हरीच्या वेळी हत्या : अरसेकेरे येथील आरोपी मुलाने एक सेकंड हँड आयफोन ऑनलाइन बुक केला होता. पोलिसांनी सांगितले की, 7 फेब्रुवारी रोजी कुरिअर बॉय आरोपीच्या घरी डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपीने माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे म्हणत आयफोनचा बॉक्स उघडण्यास सांगितले. मात्र डिलिव्हरी बॉयने पैसे दिल्याशिवाय बॉक्स उघडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर आरोपीने त्याला घरात बोलावले आणि माझा मित्र पैसे घेऊन येत असल्याची माहिती दिली. त्याने डिलिव्हरी बॉयला थोडा वेळ बसण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने मागून येऊन त्याच्यावर चाकूने वार करून त्याचा निर्घृण खून केला.