बेंगळुरू : कर्नाटकात आज काँग्रेसचे नवे सरकार अस्तित्वात येणार आहे. नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक काँग्रेस नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. 2018 मध्ये युती सरकारच्या स्थापनेदरम्यान विधानसौदा येथे आयोजित केलेल्या समारंभाप्रमाणे यावेळी देखील बेंगळुरूच्या कांतीरवा स्टेडियममध्ये गैरभाजप पक्षांच्या एकतेचे प्रदर्शन करण्यात आले आहे. या सोहळ्याकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र पाठ फिरवली असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे उपस्थित आहेत.
अनेक मोठे नेते उपस्थित राहणार : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून तर कर्नाटक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून थोड्याच वेळात शपथ घेणार आहेत. बेंगळुरूच्या कांथीरवा स्टेडियमवर दुपारी 12.30 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्याला कर्नाटक कॉंग्रेसचे अनेक नेते आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अधिकृत आमंत्रण पाठवले गेले आहे. या सोहळ्यात 11 प्रमुख राजकारणी सहभागी होण्याची शक्यता आहे.
शपथविधीला उपस्थित राहणारे मान्यवर : शपथविधीला माजी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामी तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सहभागी होण्याची शक्यता आहे. या 11 मान्यवरांच्या सहभागाबाबत अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
सहभागी मान्यवरांसाठी झेड प्लस सुरक्षा : कांथिरवा स्टेडियमवर नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या काँग्रेस हायकमांड नेत्यांसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि व्हीआयपींना झेड प्लस आणि झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी 12 एसीपी, 11 राखीव पोलिस निरीक्षक, 11 राखीव उपनिरीक्षक, 24 सहायक राखीव उपनिरीक्षक आणि 206 कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहेत.
कांथीरवा स्टेडियमभोवती कडेकोट सुरक्षा : शपथविधी सोहळ्यासाठी कॉंग्रेसचे हजारो समर्थक आणि कार्यकर्ते म्हैसूर, मंड्या, रामनगरा, उत्तर कर्नाटक आणि कोलार येथून येण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्टेडियमच्या चारही दिशांना कडक बंदोबस्त ठेवला आहे. कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात झाली असून मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी तयारीची पाहणी केली आहे.
सुरक्षेच्या उपाययोजनांचा तपशील : स्टेडियमच्या दोन गेट्समधून व्हीव्हीआयपी वाहनांना प्रवेश देण्यात येणार असून स्वतंत्रपणे प्रवेश करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. शहर पोलिस आयुक्त, वाहतूक विभागाचे विशेष आयुक्त, सहआयुक्त, दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त यांच्या व्यतिरिक्त 8 डीसीपी सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. काँग्रेसने शपथविधी कार्यक्रमात आपली ताकद दाखविण्याची तयारी केली असून या कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमासाठी 1500 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेचे नेतृत्व 10 एसीपी आणि 28 निरीक्षक करतील. एक एसीपी दर्जाचा अधिकारी आठ गेटवर सुरक्षेचे नेतृत्व करेल आणि 500 ट्रॅफिक पोलिस मैदानाला जोडणाऱ्या आजूबाजूच्या रस्त्यांवर वाहतूक व्यवस्थापित करतील.
हेही वाचा :
- Kiren Rijiju : किरेन रिजिजू यांनी भूविज्ञान मंत्रालयाचा पदभार स्वीकारला, म्हणाले - 'हा बदल म्हणजे..
- Karnataka Gov Formation : कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी; सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आज दिल्लीत घेणार पक्षश्रेष्ठींची भेट
- 2000 Rupee Note : पुन्हा नोटबंदी! 2000 च्या नोटा चलनातून बाद, या तारखेपर्यंत बदलता येणार