बीदर (कर्नाटक) :कर्नाटक विधानसभेचा जोरात प्रचार सुरू आहे. भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसह इतर प्रादेशीक पक्षही रिंगणात उतरलेल आहेत. रोज प्रचाराचा नवा अंक येथे पाहायला मिळत आहे. त्यातच आता काँग्रेस आणि भाजपमध्ये टीकेची झोड उठली आहे. त्यामध्ये एकमेकांवर जोरदार आरोप सुरू आहेत. काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान विषारी सापासारखे आहेत. त्यावरून आता पंतप्रधानांनी पलटवार केला आहे. काँग्रेसने मला आजपर्यंत 91 वेळा शिव्या दिल्या आहेत असा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील बिदर येथे जाहीर सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे.
काँग्रेसला राज्यातील जनतेची चिंता नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथे जाहीर सभेला संबोधित केले. त्यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना काँग्रेस गरीबांचा संघर्ष आणि वेदना कधीच समजून घेणार नाही असा घणाघात केला. काँग्रेस फक्त सत्तेचे राजकारण करते. तसेच, ते म्हणाले की, भाजपने येथील महिलांना घरांचे मालकी हक्क दिले आहेत. तर, काँग्रेसने केवळ तुष्टीकरणाचे राजकारण केले. काँग्रेस सरकारमुळे कर्नाटकातील जनता त्रस्त झाली आहे. काँग्रेसला राज्यातील जनतेची चिंता नसून केवळ मतांची चिंता आहे असही ते म्हणाले आहेत.