नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या आहेत. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर सुरु झालेले राजकारण आणखी पेटले आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सोशल मीडियावर कर्नाटकच्या सार्वभौमत्वावरुन पोस्ट केली होती. मात्र या पोस्टवरुन आता चांगलेच राजकारण पेटले आहे. भाजपने याबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्षांना यावर स्पष्टीकरण मागणारे पत्र पाठवले आहे.
काय होती काँग्रेसची पोस्ट :काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला होता. कर्नाटकच्या प्रतिष्ठा, एकता आणि सार्वभौमत्वाला धक्का लावलेला काँग्रेस कधीही सहन करणार नसल्याचे सोनिया गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले होते. त्यांच्या या वक्तव्याची काँग्रेसने सोशल मीडियात पोस्ट करत सोनिया गांधी यांनी कर्नाटकच्या नागरिकांना जोरदार संदेश दिल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या या वक्तव्याचा भाजपकडून चांगलाच खरपूस समाचार घेण्यात आला.
काँग्रेसची मान्यता रद्द करुन गुन्हा दाखल करा :काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी कर्नाटकसाठी सार्वभौमित्व हा शब्द वापरल्याने भाजपने काँग्रेसवर मोठा हल्लाबोल केला. काँग्रेसची मान्यता रद्द करुन सोनिया गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीतील निवडणूक समितीला या मुद्द्यावर निवेदन सादर केले. कर्नाटक हे भारतीय संघराज्यातील एक अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. भारतीय संघराज्यातील राज्याच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र ही सरळसरळ अलिप्ततेची हाक असून ते घातक असल्याचे यावेळी भाजप नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सोनिया गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करुन काँग्रेसची मान्यता रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
हा तर कर्नाटकला भारतापासून वेगळे करण्याचा डाव :भाजपचे खासदार अनिल बलुनी, नेते ओम पाठक तरुण चुग यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाकडे याबाबतची तक्रार केली. यावेळी या शिष्टमंडळाने लोकप्रतिनिधी कायद्याचा हवाला देत काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द केली पाहिजे असे स्पष्ट केले. भाजपने या मुद्द्यावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा हवाला देत काँग्रेसच्या ट्विटची प्रतही सादर केली. सोनिया गांधी यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या जाहीर सभांमध्ये उल्लेख करुन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस पक्ष कर्नाटकला भारतापासून वेगळे करण्याचे खुलेपणाने समर्थन करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तुकडे तुकडे टोळीचा आजार काँग्रेसच्या वरच्या स्तरावर पोहोचल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.