महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कमला हॅरिस यांच्या मामाचा अंदाज ठरला खरा - राष्ट्राध्यक्ष निवडणूक

भारतीय-अमेरिकन, आफ्रिकन- अमेरिकन आणि दक्षिण आशियायी वंशाच्या कमला हॅरिस यांना मतदार पसंती देतील का? याबाबत कमला हॅरिस यांच्या मामांनी ईटीव्ही भारतशी चर्चा केली होती. त्यांनी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला आहे.

कमला हॅरिस
कमला हॅरिस

By

Published : Nov 7, 2020, 11:50 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या विजय झाला आहे. त्यामुळे बायडेन यांच्या 'रनिंग मेट' म्हणजेच उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस याचाही विजय झाला आहे. त्या उपराष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय वंशाच्या महिला ठरणार आहेत. भारतीय-अमेरिकन, आफ्रिकन- अमेरिकन आणि दक्षिण आशियायी वंशाच्या कमला हॅरिस यांना मतदार पसंती देतील का? याबाबत कमला हॅरिस यांच्या मामांनी ईटीव्ही भारतशी चर्चा केली होती. त्यांनी व्यक्त केलेला अंदाज आता निकालानंतर खरा ठरल्याचे दिसून येत आहे.

जो बायडेन आणि कमला हॅरिस यांची जिंकण्याची शक्यता ९० टक्के असल्याचे मत कमला हॅरिस यांचे भारतातील मामा डॉ. जी. बालचंद्रन यांनी व्यक्त केले होते. ते आता निकालानंतर खरे ठरले आहे.

२०१६ आणि आताची स्थिती वेगळी

कमला हॅरिस यांचे मामा डॉ. जी. बालचंद्रन हे माजी पत्रकार आणि उच्चशिक्षित आहेत. त्यांनी ईटीव्ही भारतच्या वरिष्ठ पत्रकार स्मीता शर्मा यांच्याशी दिल्लीत निकालाआधी चर्चा केली होती. यावेळी ते म्हणाले होते, '२०१६ ची आणि आताची स्थिती वेगळी आहे. राजकारणात नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल अनेकांना काहीही माहिती नव्हती. तसेच २०१६ ला डेमोक्रॅटिक पक्षाच्या कामगार वर्गासंबधीच्या काही धोरणांबाबत जनतेत नाराजी होती. त्यामुळे तेव्हाची स्थिती वेगळी होती. ट्रम्प यांनी निवडून आल्यानंतर भरीव असे काहीही केले नाही. कोरोना महामारी तर ट्रम्प यांचे सर्वात मोठे अपयश आहे, असे डॉ. बालचंद्रन म्हणाले.

तामिळनाडूतील मूळ विजयसाठी झाली प्रार्थना

'कमला हॅरिस यांच्या यशाचा कुटुंबीयांना मोठा अभिमान आहे. मात्र, त्यांच्या आईकडील जवळचे नातेवाईक विविध देशांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे निकालानंतर एकत्र आनंदोत्सव साजरा करता येणार नाही. मात्र, कमला यांच्या विजयासाठी तामिळनाडूतील मूळ गावी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आल्याचे बालचंद्रन यांनी सांगितले होते.

नागरी हक्कांसाठी कमला हॅरिस कायमच जागरुक

कमला हॅरिस या कार्यक्षम लोकनेत्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्या अमेरिकेतील सर्वात मोठ्या कॅलिफोर्निया राज्याच्या महाधिवक्त्या होत्या, त्यानंतर त्यांनी सिनेटर पदापर्यंत मजल मारली. या २० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांच्यातील सामर्थ्य दिसून येत असल्याचे बालचंद्रन म्हणाले. नागरी हक्क आणि आफ्रिकन अमेरिकन मोहिमांबाबत कमला हॅरिस लहानपणापासून जागरुक आहे. त्या काळात नागरी हक्क मोहिमेत कोणी भारतीय महिलेने सहभागी होणे क्वचितच दिसत असे. कमला आफ्रिकन अमेरिकन समाजात वाढली आहे. त्यामुळे या लोकांसाठी कायदे आणि धोरण आखण्यात त्या मोलाचा सहभाग देऊ शकतात, असे बालचंद्रन म्हणाले.

६० ते ७० टक्के अमेरिकन भारतीय बायडेन यांच्या बाजूने

अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे नागरिक डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक समजले जातात. या निवडणुकीत त्यांचा कल कोणाकडे असेल, असे विचारले असता बालचंद्रन म्हणाले होते, काही जणांना ट्रम्प आणि मोदी चांगले मित्र वाटतात. त्यामुळे कदाचित ते ट्रम्प यांच्या बाजूने झुकलेले असू शकतात. मात्र, सर्वांगीन विचार करता ६० ते ७० टक्के भारतीय बायडेन यांचे समर्थक आहेत.

२०२४ ला राष्ट्राध्यक्षपदासाठी दावेदार

कमला हॅरिस म्हणजेच आपल्या भाचीला बालचंद्रन यांनी निवडणूकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. शेवटी त्यांनी कमला हॅरीस यांच्या उमेदीच्या काळातील काही आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले होते, कमला जेव्हा अमेरिकेत जिल्हा अधिवक्ता पदाच्या निवडीसाठी उभी राहीली होती, तेव्हाच तिच्यात राजकारणात यश मिळविण्याची ताकद असल्याचे दिसले होते. मृत्यू दंडांच्या शिक्षेविरोधातही कमला निर्धाराने उभी राहिली होती. अमेरिकेच्या इतिहासातील पहिली महिला उपाध्यक्ष होण्यासाठी ती आशावादी आहे. तसेच २०२४ च्या निवडणुकांत राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे राहण्याची कमला हॅरीस यांची शक्यता वाढली असल्याचे ते म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details