तेलंगाणा(हैदराबाद) -कैलाश सत्यार्थी यांनी शनिवारी तेलंगाणा डीजीपी कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सायबर गुन्हेवाढीबद्दल चिंताही व्यक्त केली आहे. सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवर भडक मजकूर उपलब्ध झाल्यामुळे मुलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचाराबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
तेलंगाणा पोलिसांचे कौतुक - महिला आणि बाल तस्करी रोखण्यासाठी तेलंगाणा पोलीस काम करत आहेत. हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याच्या आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा जोडण्यासाठी तेलंगाणा पोलिसांच्या पुढाकाराचे कैलाश सत्यार्थी यांनी कौतुक केले आहे. तेलंगाणा पोलिसांनी राबवलेल्या धोरणांमुळे बाल तस्करी आणि इतर संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यात यश आले आहे. त्याबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले.
DGP, ADGP यांचे विशेष कौतुक - बालहक्कांचे संरक्षण करण्यासाठी तेलंगाणाचे डीजी अंजनी कुमार यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे कौतुक कैलाश सत्यार्थी यांनी केले आहे. तसेच वीटभट्ट्यांमधून बालमजुरी दूर करण्यासाठी आणि स्थलांतरित ओडिशा, महाराष्ट्रातील मुलांसाठी त्यांच्या मातृभाषेत शाळा सुरू करण्याच्या ADGP, CID हेड आयपीएस महेश भागवत यांच्या प्रयत्नांची कैलाश सत्यार्थी यांनी प्रशंसा केली आहे.
महिला सुरक्षा विभागाची स्थापना - नोबेल पारितोषिक विजेते पहिल्यांदाच डीजीपी कार्यालयात आले होते. तेलंगाणा सरकारने बालकं आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. तसेच अतिरिक्त DG स्तरावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षा विभागाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती तेलंगाणाचे डीजीपी अंजनी कुमार यांनी यावेळी बोलताना दिली.
महेश भागवत यांचे विशेष कार्य - अतिरिक्त DGP महेश भागवत यांनी सत्यार्थी यांच्या बचपन बचाव या संस्थेद्वारे केलेल्या कामांची प्रशंसा केली आहे. या संस्थेने जवळपास एक लाख मुलांना जीवदान दिले आहे. महेश भागवत यांनी नमूद केले की, सत्यार्थी यांच्या कार्यामुळे हरवलेल्या मुलांविरुद्ध एफआयआर नोंदवणे यासारख्या महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या आहेत. तेलंगाणा पोलिसांच्या महिला आणि बाल तस्करीविरोधी कार्यावर प्रकाश टाकताना तेलंगाणातील सर्व पोलिस आयुक्त/जिल्ह्यांमध्ये स्थापन केलेल्या 31 AHTUs या मोहिमेचा महेश भागवत यांनी यावेळी उल्लेख केला आहे. या मोहिमेद्वारे तेलंगाणातील तस्करीविरोधी कार्याला प्राधान्य दिले जात असल्याचे भागवत यावेळी म्हणाले.
हेही वाचा -
- दक्षिणेतील 'द रियल सिंघम' मानव तस्करांचा कर्दनकाळ, या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा अमेरिकेत डंका'
- वीटभट्टीच्या धुरानं 'काळवंडलं' चिमुकल्यांचं जीवन, 'या' पोलीस आयुक्तांच्या पुढाकारातून असं फुलत आहे शिकण्याचं स्वप्न
- तेलंगाणातील मराठी IPS अधिकाऱ्याची कामगिरी; महाराष्ट्रात येणारा हजारो किलो गांजा जप्त