नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी पोलाद मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. सिंधिया सध्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार सांभाळत आहेत. राज्यसभेत मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारे ५१ वर्षीय खासदार सिंधिया सध्याच्या मोदी सरकारमधील तिसरे पोलाद मंत्री आहेत.
Jyotiraditya Scindia assumes Steel Ministry: ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पोलाद मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला
रामचंद्र प्रसाद सिंह यांचा राज्यसभेचा कार्यकाळ काल संपला. त्यामुळे त्यांच्याकडील पोलाद मंत्रालयाचा कार्यभार केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी स्वीकारला.
सिंधिया यांनी आसनस्थ होण्यापूर्वी उद्योग भवनातील त्यांच्या कार्यालयातील टेबलावर गणपतीची मूर्ती ठेवून पूजा केली. पोलाद सचिव संजय कुमार सिंह आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला. ते रामचंद्र प्रसाद सिंह यांची जागा घेतील. त्यांनी बुधवारी त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी पदाचा राजीनामा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बुधवारी निर्देश दिले की नागरी विमान वाहतूक मंत्री सिंधिया यांना त्यांच्या विद्यमान मंत्रिपदाव्यतिरिक्त पोलाद मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात यावा, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.