नवी दिल्ली : शिवसेनेचे धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि शिवसेना पक्षनाव केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाने या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली असून याप्रकरणी उद्याच निकाल जाहीर होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी जाहीर केले आहे. उद्या दोन घटनापीठाचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी पुढे स्पष्ट केले. दरम्यान, कोर्टाचे संपूर्ण कामकाज हे लाईव्ह दाखवले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे कामकाज घरबसल्या पाहता येणार आहे.
उद्या सकाळीच महत्त्वाच्या सुनावण्या : सर्वोच्च न्यायालयात गेल्या अनेक दिवसांपासून समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. दरम्यान, यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावण्यांसदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, उद्या दोन घटनापीठातील महत्त्वाच्या प्रकरणी निकाल द्यायचा आहे. समलिंगी विवाहाप्रकरणी सुरू असलेली सुनावणी उद्या दुपारी १२ वाजता करण्यात यावी, कारण, उद्या सकाळीच महत्त्वाच्या सुनावण्या लिस्टिंग आहेत, असे माहिती सरन्यायाधीशांनी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सांगितली आहे.
ज्येष्ठ न्यायमूर्ती एम. शाह १५ मे रोजी निवृत्त : या प्रकरणांची सुनावणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमार झाली. या घटनापीठातील दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम. शाह १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत, त्यामुळे याप्रकरणी जलद निकाल येईल, असं बोलले जात होते. गेल्या दोन दिवसांपासून या निकालाच्या चर्चांना जोर आला होता. अखेर, सरन्यायाधीश यांनीच याप्रकरणी खुलासा केला आहे.
अध्यक्ष कोण? :आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधिमंडळातच होईल, असे कायदेतज्ज्ञ सांगत आहेत. पण हा निर्णय कुणाच्या अध्यक्षतेखाली होणार? विधानसभेचे तत्कालिन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ की सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर? याबाबत सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे. यावर उद्या निकालाची शक्यता आहे.