गिरिडीह(झारखंड) : झारखंडमधील गिरिडीहमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रांचीहून गिरिडीहकडे येणारी प्रवासी बस बराकर नदीत कोसळली. त्यावेळी बसमध्ये सुमारे 30 जण प्रवास करत होते. या घटनेत किती लोकांचे प्राण गेले आणि किती मालमत्तेचे नुकसान झाले आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. (Jharkhand Bus Accident).
बस नदीत पडल्यानंतर बचावकार्य पथकाकडून तीन तास काम सुरू होते. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. रात्रीच जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार मृतांपैकी एकाची अद्याप ओळख पटलेली नाही. बसचा चालक अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंड सरकारच्या मंत्री बेबी देवी यांनी मध्यरात्री रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत प्रकृती जाणून घेतली. मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बस नदीच्या पुलावर येताच चालकाचा तोल गेला : बस नदीत कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेत प्रवाशांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आलिशान (सम्राट) नावाची ही बस रांचीहून गिरिडीहला जात असताना बराकर नदीत कोसळली. बस नदीच्या पुलावर येताच चालकाचा तोल गेला आणि बस नदीत पडली, असे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी बस अतिशय वेगात होती, असेही सांगितले जात आहे.