भोपाळ- मध्यप्रदेशातील सीधी जिल्ह्यात बस कालव्यात पडून झालेल्या दुर्घटनेत ५० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला. यावरुन विरोधी पक्ष काँग्रेसने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी सीधी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहात थांबले होते. मात्र, त्यांना रात्री तेथे मच्छर चावल्याने विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याला निलंबित केल्याचा आरोप काँग्रेस नेते जीतू पटवारी यांनी केला आहे.
सीधी जिल्ह्यात एवढी मोठी दुर्घटना घडली. मात्र, अद्याप सरकारने कोणालाही जबाबदार धरले नाही. तसेच योग्य ती कारवाई केली नाही. मात्र, रात्री मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मच्छर चावल्याची घटना सीधीच्या दुर्घटनेपेक्षा मोठी निघाली. सीधी जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्यालाच निलंबित करण्यात आले, असे जीतू पटवारी म्हणाले. दरम्यान, कर्मचाऱ्याला निलंबित केल्याचे सरकारी पत्र समोर आले आहे. स्वच्छता न राखल्याने अतिथींची गैरसोय झाल्याचे, परिसरात मच्छर झाल्याच्या तक्रारी येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.