उरी :भारतीय सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी सुरू केलेल्या संयुक्त कारवाईत शनिवारी सकाळी बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. सैन्यानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ३ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांना जवानांनी ठार केलं. मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडल्याचंही सैन्यानं सांगितलं. तिसरा दहशतवादी मारला गेला, परंतु नियंत्रण रेषेजवळील आसपासच्या भागात सततच्या गोळीबारामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडथळे येत असल्याचं सैन्यानं निवेदनात म्हटलं आहे.
दहशतवाद्यांचं ठिकाण शोधून काढण्यासाठी ड्रोनचा वापर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारपासून (१३ सप्टेंबर) चकमक सुरू आहे. बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सैन्याचे तीन अधिकारी आणि एक जवान शहीद झाला होता. अनंतनाग जिल्ह्यातील डोंगराळ व जंगल भागात कब्जा केलेल्या दहशतवाद्यांचं ठिकाण शोधून काढण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. या भागात गेल्या चार दिवसांपासून शोधमोहीम सुरू आहे. शनिवारी कोकरनागमधील गाडोळे जंगल परिसरात सैन्य आणि पोलिसांकडून संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली.
दहशतवादी लपलेल्या ठिकाणावर ग्रेनेड टाकले : अनंतनाग भागात दहशतवाद्यांविरुद्धच्या संयुक्त सुरक्षा मोहिमेमध्ये, सैन्यानं ड्रोनचा वापर करून संशयित दहशतवादी लपलेल्या ठिकाणावर ग्रेनेड टाकले. परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटाला लक्ष्य करण्यासाठी सैनिकांकडून ग्रेनेड लाँचरचाही वापर केला जात आहे. गोळीबारादरम्यान, सुरक्षा दलांनी डोंगराळ भागातील जंगलाच्या दिशेने मोर्टार गोळीबार केला. दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची कारवाई शुक्रवारीही जारी होती.
परिसराची नाकाबंदी केली आहे : सध्या सुरक्षा दलांनी परिसराची नाकाबंदी केली आहे. डोंगराच्या मागील भागात नाले व नद्या असल्यानं तेथून दहशतवाद्यांना पळून जाणं अवघड आहे. बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत, १९ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर मेजर आशिष धौंचक, कर्नल मनप्रीत सिंग, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायून भट आणि सैन्याचा एक जवान दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील कोकरनाग भागातील गडोले येथे शहीद झाले होते.
हेही वाचा :
- Anantnag Martyr Funeral : कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौंचक यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार, मोठ्या संख्येनं जनसमुदाय उसळला
- Anantnag Encounter : जिथं बजावलं पहिलं कर्तव्य तिथंच घेतला अखेरचा श्वास, पानिपतच्या मेजर आशिष धौंचकची शौर्यगाथा
- Anantnag Encounter : दहशतवाद्यांशी लढताना सैन्याच्या कर्नल, मेजरसह तीन अधिकाऱ्यांना वीरमरण