जम्मू : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या चकमकीत एका संशयित दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. दरम्यान, परिसरात सैन्य दलाकडून शोध मोहीम राबविली जात आहे.
काश्मीर पोलीस-लष्कराची संयुक्त मोहीम
सुरक्षा दलातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील रखमा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर सैन्य दलाच्या 34 व्या बटालियनने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने इथे शोध मोहीम राबविली. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने चकमक उडाली. सैन्य दलाने प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात एक संशयित दहशतवादी ठार झाला. दरम्यान, परिसरात सैन्य दलाकडून शोध मोहीम राबविली जात आहे.
काश्मिरात चालू वर्षात 89 अतिरेकी यमसदनी
ऑगस्ट महिन्यातील आकडेवारीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये चालू वर्षात सात पाकिस्तानी नागरिकांसह 89 अतिरेक्यांना सुरक्षा दलाने यमसदनी धाडले आहे. ही माहिती लष्कर आणि पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. परंतु यावर्षी अधिक कमांडर मारले गेल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) विजय कुमार यांनी सांगितले.
दहशतवाद्यांकडून भाजप नेते लक्ष्य
गत 17 ऑगस्टला भाजपचे नेते जावेद अहमद दार यांची दक्षिण काश्मिरातील कुलगाम परिसरात हत्या झाली होती. दार हे शालीभाग विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रभारी होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने भाजप नेत्यांवर हल्ले होताना दिसत आहे. त्यापूर्वी 13 ऑगस्ट 2021 रोजी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे नेते जसबीर सिंग यांच्या निवासस्थानी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा -बाडाहोती सेक्टरमध्ये 100 चिनी सैनिकांनी केली होती घुसखोरी? उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात...