चेन्नई :चंद्रयान 3 मोहिमेचं सॉफ्ट लँडींग आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सायंकाळी करण्यात येणार आहे. मात्र सॉफ्ट लँडींगवरुन अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत. सॉफ्ट लँडींगला तांत्रिक अडथळा आल्यास इस्रोचा 'प्लॅन बी' तयार असल्याचं काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र नियोजित वेळेतच चंद्रयान 3 चं सॉफ्ट लँडींग होणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली आहे. कोणताही 'प्लॅन बी' वापरण्याची वेळ येणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
चंद्रयान 3 ची सगळी यंत्रणा सुरळीत :चंद्रयान 3 मोहिमेच्या सॉफ्ट लँडींगमध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास सॉफ्ट लँडींग 27 ऑगस्टला करण्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं. 27 ऑगस्टला लँडींग झाल्यास हे सॉफ्ट लँडींग नियोजित जागेपासून 400 किमी दूर करण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं होतं. मात्र यावर इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांना विचारलं असता, त्यांनी असं काही करण्याची गरजच पडणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे.
लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा घेत आहे छायाचित्रं :चंद्रयान 3 मोहिमेच्या प्रणालीची सातत्यानं तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंतचं काम सुरुळीत सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. शेवटच्या मिनिटात काही तांत्रिक अडचण आल्यास इस्रोचा प्लॅन बी सुरु होईल, अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. विक्रम लँडरमध्ये असलेला लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा ( LPDC ) सातत्यानं साईटची छायाचित्रं घेत असल्याची माहिती इस्रोच्या वतीनं देण्यात आली आहे. लँडरमध्ये लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेरा (LHDAC) नावाचा दुसरा कॅमेरा देखील आहे. हा कॅमेरा सुरक्षित लँडिंग क्षेत्र शोधण्यात मदत करत असल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे.
- चंद्रयान 3 योजना 600 कोटींची : चंद्रयान 2 ही मोहीम अपयशी ठरल्यानंतर इस्रोनं चंद्रयान 3 ही मोहीम हाती घेतली आहे. चंद्रयान 3 या अंतराळयानात 2 हजार 148 किलोचं प्रोपल्शन मॉड्यूल होतं. तर 1 हजार 723 किलोचं लँडर आणि 26 किलोचं रोव्हर आहे. मात्र प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळं झालं आहे. चंद्रयान 3 ही मोहीम 600 कोटी रुपयाची आहे.
हेही वाचा -
- Chandrayaan 3 Live Updates : विक्रम लँडरच्या 'सॉफ्ट लँडींग'ची जगभरात उत्सुकता, इस्रोच्या यशासाठी अनेक ठिकाणी प्रार्थना
- Chandrayaan 3 : चंद्रयान-3 मोहिमेत तांत्रिक अडचण आल्यास चिंता नको... इस्रोचा 'हा' प्लॅन तयार