अहमदाबाद : चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर आज सॉफ्ट लँडींग करणार आहे. मात्र नुकतचं रशियाचं लुना 25 यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर क्रॅश झाल्यानं रशियाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेकडं जगाचं लक्ष लागलं. जर आज इस्रोला चंद्रयान 3 मोहिमेत अपयश आलंच तर मग काय, असा सवाल करोडो भारतीयांना पडला आहे. मात्र त्यावरही इस्रोच्या संशोधकांनी उपाय योजला आहे. जर आज चंद्रयान 3 मोहिमेत काही अडथळा आला, तर इस्रोच्या संशोधकांचा 'प्लॅन बी' तयार असल्याची माहिती अहमदाबाद येथील इस्रो सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी दिली.
पुन्हा करणार लँडींगचा प्रयत्न :इस्रोचे शास्त्रज्ञ विक्रम लँडरचं यशस्वी लँडींग करण्यासाठी मोठी कसरत करत आहेत. मात्र काही तांत्रिक अडचण आलीच तर संशोधकांनी आपला 'प्लॅन बी' तयार ठेवला आहे. इस्रोचे अहमदाबाद येथील संचालक निलेश देसाई यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली. लँडींग नियोजितपणे होईल, मात्र लँडींगमध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास पुन्हा 27 ऑगस्टला लँडींग करण्यात येईल, अशी माहिती निलेश देसाई यांनी दिली.