महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Israel Palestine Conflict : . . तर हमासकडून लढण्यासाठी सुप्रिया सुळेंना गाझात पाठवा; पॅलेस्टाईनच्या समर्थनानंतर शरद पवारांवर 'या' दिग्गज नेत्यांनी डागली तोफ

Israel Palestine Conflict : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पॅलेस्टाईनचं समर्थन करणारं वक्तव्य केल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन सुरू असलेलं युद्ध हे पॅलेस्टाईनच्या भूमीवर सुरू असल्याचं शरद पवार यांनी एका कार्यक्रमात सांगितलं आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यावर भाजपाच्या नेत्यांनी टीका केली आहे.

Israel Palestine Conflict
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 8:08 AM IST

Updated : Oct 19, 2023, 9:51 AM IST

हैदराबाद Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या वादात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उडी घेतली आहे. मात्र शरद पवार यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्यानं भाजपाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध पॅलेस्टाईनच्या भूमीवर सुरू असल्याचा दावा शरद पवार यांनी केला. त्यामुळे केंद्रीय मंत्री पियूश गोयल, नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तर शरद पवार यांना दहशतवादाचा इतका पुळका येत असेल, तर त्यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना हमासकडून लढण्यासाठी गाझाला पाठवावं, असा टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार :इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध सुरू आहे. मात्र युद्ध सुरू असलेल्या ठिकाणी अगोदर अतिक्रमण करण्यात आलं. त्यानंतर इस्रायल देश उदयाला आहे. मला या इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या या वादाच्या खोलात जायचं नाही. मात्र आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी या पंतप्रधानांनी पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका घेतली होती, असं शरद पवार म्हणाले. मात्र आपल्या पंतप्रधानांनी यावेळी इस्रायलची बाजू घेत, मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडं दुर्लक्ष केलं आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. देशाच्या पंतप्रधानांची भूमिका काहीही असो, आपली भूमिका स्वच्छ असायला हवी, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

तर सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवा :हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानं हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध पॅलेस्टाईनच्या भूमीवर सुरू असल्यानं म्हटल्यानं भाजपाकडून पवारांना लक्ष्य करण्यात आले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तर शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. शरद पवार यांना हमासचा इतकाच पुळका आला असेल, तर त्यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना हमासकडून लढण्यासाठी गाझाला पाठवलं पाहिजे, अशी जहरी टीका केली आहे.

ही कुजलेली मानसिकता थांबली पाहिजे :राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी इस्रायल हल्ल्याबाबत केलेलं विधान अतिशय निंदनीय असल्याचं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. भारताच्या भूमीवर शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता असं निंदनीय विधान करतो, तेव्हा अस्वस्थता होते. जगातील कोणत्याही भागातील दहशतवादाचा निषेधच केला पाहिजे. मात्र भारताचे संरक्षण मंत्री आणि अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीनं दहशतवादावर असं व्यक्त होणं खेदजनक आहे. ही कुजलेली मानसिकता थांबली पाहिजे. शरद पवार यांनी आता तरी अगोदर देशाचा विचार करावा, असा हल्लाबोल पियूष गोयल यांनी केला.

शरद पवारांच्या बेजबाबदार विधानांचा निषेध :राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या बेजबाबदार विधानांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केलं आहे. इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडली आहे. मात्र त्यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. भारत सातत्यानं दहशतवादाच्या विरोधात आहे. इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांनी केलेला निषेध हे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी आमच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचंही नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादीकडून भाजपावर पलटवार-भाजपाच्या नेत्यांकडून टीका झाल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते (शरद पवार गट) क्लाईड क्रास्टो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणाले, पीयूष गोयल हे केंद्र सरकारमधील मंत्री असताना त्यांनी थोडासा गृहपाठ करणं आवश्यक आहे. कारण त्यांचे इतर मंत्री किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी पॅलेस्टाईनबद्दल काय बोलतात, हे त्यांना माहित नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही पॅलेस्टाईनच्या प्रश्नाला पाठिंबा दिला होता. हे गोयल यांनी इतिहासात जाऊन अभ्यासले पाहिजे. पॅलेस्टाईनच्या लोकांना पाठिंबा देण्याची भारताची भूमिका आहे. त्याबाबत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर काय म्हणाले होते, हे पियूष गोयल यांनी वाचले पाहिजे. परराष्ट्रमंत्री हे स्वतंत्र सार्वभौम पॅलेस्टाईन राज्याच्या निर्मितीवर बोलले आहेत. पियूष गोयल यांनी शरद पवारांवर टीका करणं म्हणजे त्यांचे ज्ञान कसे कमकुवत आहे हे दर्शविणं आहे.

हेही वाचा :

  1. Nushrratt Bharuccha : युद्धग्रस्त इस्रायलमधून परतल्यानंतर नुसरत भरुचानं पहिला व्हिडिओ केला शेअर ; भारत सरकारचे मानले आभार...
  2. Palestinian Israeli Conflict : हमास-इस्रायल युद्धात रशियाची उडी; स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्याची व्लादिमीर पुतीन यांची मागणी
Last Updated : Oct 19, 2023, 9:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details