नवी दिल्ली : 2014 पासून देशात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष एक-एक करत आपले सर्व वादे पूर्ण करत आहे. आता पक्षाची नजर 2023 मधील विविध विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांवर आहे. आता समान नागरी संहिता आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा हे असे मुद्दे आहेत ज्यावर पक्षाचे लक्ष आहे. या मुद्यावर भाजप खासदार हरनाथ सिंह (BJP MP Harnath Singh) म्हणाले की, "जनसंघाच्या काळापासून समान नागरी कायदा हा आमचा मुद्दा आहे. हा आमचा निवडणुकीचा अजेंडा नाही. कोणत्याही समाजातील महिलांमध्ये धर्म, लिंग, संप्रदाय आणि भाषेच्या आधारावर भेदभाव केला जाऊ नये, हा आमचा मुद्दा पूर्वीपासून आहे. परंतु काही लोकांनी याला धर्माशी जोडले आहे". (BJP MP Harnath Singh on Uniform Civil Code).
भाजपला सर्व महिलांना समान अधिकार द्यायचे आहेत : हरनाथ सिंह म्हणाले की, "हिंदू धर्मात सुनेला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तसाच अधिकार सर्व धर्मातील महिलांना मिळावा, अशी आमची इच्छा आहे. यामध्ये आम्ही पोटगी, पालकत्व आणि निपुत्रिक दाम्पत्याला मुले दत्तक घेण्यासारख्या हक्काबाबत बोलतो आहे. यात गैर काय?". ते पुढे म्हणाले की, "काही पक्ष आणि मौलाना कुरबुरी करत आहेत. त्यांना त्यांच्या समाजातील महिलांना पुढे जाऊ द्यायचे नाही. मात्र भाजपला घटनेनुसार सर्व महिलांना समान अधिकार द्यायचे आहेत. पण अनेक पक्षांनी शुक्रवारी ज्या प्रकारे आंदोलन केले ते आश्चर्यकारक आणि हास्यास्पद आहे."