नवी दिल्ली : मणिपूरमधील महिलांना जमावाने विवस्त्र करुन त्यांची धिंड काढल्यामुळे देशभरात संतापाची लाट उठली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र मणिपूरमधील इंटरनेट बंदी उठवल्यानंतर असे अनेक व्हिडिओ बाहेर येण्याची भीती मणिपूरमधील थौबल लोकसभा मतदार संघाचे खासदार लोरोह एस फोजे यांनी व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन दिवस मणिपूरमध्ये दौरा केल्यानंतरही हिंसाचार थांबला नसल्याचा आरोपही खासदार लोरोह एस फोज यांनी केला. खासदार लोरोह एस फोजे हे नागा पीपल्स फ्रंट पक्षाचे नेतृत्व करतात.
फक्त दोनच महिलांवर अत्याचार झाला नाही :मणिपूरमध्ये दोन समुदायात सुरू असलेल्या हिंसाचाारामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. मात्र मणिपूरमधील इंटरनेट बंदी काढल्यानंतर असे अनेक व्हिडिओ बाहेर येण्याची भीती खासदार लोरोह एस फोजे यांनी गुरुवारी ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. अशाच प्रकारच्या अनेक घटना या हिंसाचारग्रस्त परिसरात घडल्या आहेत. अनेक महिन्यांपासून क्रूर जातीय संघर्षाला राज्यातील नागरिक बळी पडत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जमाव रस्त्यावर आल्यावर सुरक्षा रक्षक दिसले नाहीत :मणिपूरमध्ये दोन महिलांवर अत्याचार केल्याची क्रूर घटना 4 मे रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. या दोन महिलांची नग्न धिंड केल्याची घटना माझ्या मतदार संघात असलेल्या कांगपोकपीमध्ये घडली. हा जमाव कसा फिरत होता, हे अत्यंत दुर्दैवी आहे. जमावाला नियंत्रित करणारे सुरक्षा दलाचे जवान रस्त्यावर असतील, अशी अपेक्षा होती. पण जेव्हा आम्ही हा जमाव बघायला आलो, तेव्हा आम्हाला एकही पोलीस कर्मचारी गस्त घालताना दिसला नसल्याचा आरोपही खासदार फोजे यांनी यावेळी केला.