पाटणा - विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. परंतु जर तुम्ही आजही खेड्यात गेलात, तर तुम्हाला अंधविश्वासाच्या गोष्टी आढळतील. आजच्या आधुनिक विज्ञानाच्या युगातही ग्रामीण भागातील समाज हा अजूनही अंधश्रद्धेच्या चिखलात रुतलेला आहे. असाच काहीसा प्रकार बेगूसरायमध्ये पाहायला मिळाला आहे. अंधश्रद्धेचा अघोरी खेळामुळे एका युवकाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी तरूणाला मृत घोषित केले. पण तांत्रिक त्याला जिवंत करून दाखवण्याचा दावा करत होता. ही घटना सहाय्यक पोलीस स्टेशन परिसरातील जगदीशपूर गावची आहे.
जगदीशपूरच्या गंगासागरचा मुलगा राजा कुमार (22 वर्षे) हा गावच्या बहियार येथे घोडी आणण्यासाठी गेला होता. परत आल्यावर त्याने जनावरांना चारासुद्धा दिला. मात्र, अचानक त्यांची तब्येत बिघडली. यावेळी गावातील काही लोकांनी त्याला सर्पदंश झाला असावा, असा अंदाज वर्तवला. त्यानंतर रुग्णालयात नेण्याऐवजी गावातीलच फिरो स्थान मंदिरात त्याला नेण्यात आले. तांत्रिकाने तंत्र-मंत्रांच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तंत्र-मंत्रांने काहीच फरक पडत नसून तब्येत आणखी बिघडल्याचे दिसल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.