नवी दिल्ली -कोरोना विरोधी लढाईत भारताने आघाडी घेतली आहे. एकीकडे करोनाचे नवीन रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. सर्वांत जास्त लसीकरण करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. लसीकरणाच्या बाबतीत अमेरिकेला भारताला मागे टाकले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढ लक्षात घेता लसीकरणाच्या प्रक्रिया देखील वेगात सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे.
कोरोनाविरोधी लस देण्याच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की आतापर्यंत भारतात कोविड लसीचे 32,36,63,297 डोस दिले गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत कोरोना लसीचे 32,33,27,328 डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने शनिवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले, की जुलैपर्यंत कोरोना लसीच्या एकूण 51.6 कोटी डोस प्रदान केले जातील. त्यापैकी 35.6 कोटी डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केन्द्र सरकार वचनबद्ध आहे.
मुलांना लवकरच लस मिळणार -
मुलांना लस देण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटले आहे, की 12 मे रोजी भारताच्या औषध नियामकाने भारत बायोटेकला 2-18 वर्षांच्या मुलांवर कोव्हॅक्सिनची चाचणी करण्याची परवानगी दिली होती. तसेच भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या लसीच्या 12 ते 18 वयोगटातील मुलांवरील क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. लस आता मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. झायडस कॅडिला ही जगातील पहिली DNA आधारित लस आहे. भारतात आतापर्यंत तीन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे.
देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...
- गेल्या 24 तासांत रुग्णांची नोंद - 46,148
- गेल्या 24 तासांत मृत्यूची नोंद - 979
- एकूण रुग्ण - 3,02,79,331
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण - 2,93,09,607
- सक्रिय रुग्ण संख्या - 5,72,994
- एकूण मृत्यू - 3,96,730
- एकूण लसीकरण - 96.80%
'डेल्टा प्लस' व्हेरिएंटमुळे वाढली चिंता -
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. देशात आजपर्यंत 50 रुग्ण 'डेल्टा प्लस'चे आढळले आहेत. यातील सर्वांत जास्त रुग्ण हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू राज्यात आढळले आहेत. देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरण्यास 'डेल्टा' व्हेरियंट कारणीभूत ठरला होता. आता तिसरी लाट 'डेल्टा प्लस' व्हेरिएंटमुळे पसरणार असल्याचे बोलले जात आहे. डेल्टा प्रकार जगातील 80 देशांमध्ये आहे. तर डेल्टा प्लस हा व्हॅरिएंटसध्या ब्रिटन, अमेरिका, जपान, रशिया, भारत, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, नेपाळ आणि चीन या 9 देशांमध्ये आढळला आहे