लष्कराच्या हेलिकॉप्टरला तमिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळलं. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 12 लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. सर्वांचे मृतदेह शुक्रवारी दिल्लीत आणले जाणार आहेत व सायंकाळच्या सुमारास सर्वांवर अंत्यसंस्कार केले जातील.
Army Helicopter Crash LIVE Updates : हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले CDS बिपीन रावत यांचे निधन, कॅप्टन वरुण सिंह जखमी - भारतीय संरक्षण दलाचे हेलिप्टर दुर्घटनाग्रस्त
21:39 December 08
बिपीन रावत व अन्य अधिकाऱ्यांचे मृतदेह उद्या दिल्लीत आणले जाणार
21:36 December 08
तमिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेत वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह जखमी, उपचार सुरू
लष्कराच्या हेलिकॉप्टरला तमिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळलं. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 12 लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Gp Capt Varun Singh) हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. 14 पैकी 13 जणांचे निधन झाले आहे. वरुण सिंह एकमेव जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. वरुण सिंह यांनी 2020 मध्ये एका मोठ्या संकटातून तेजस लढाऊ विमानाला वाचवलं होतं. त्यांच्या या धाडसामुळेच त्यांना या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे.
18:45 December 08
जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक व एक सच्चा देशभक्त -मोदी
जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक व एक सच्चा देशभक्त होते. त्यांनी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन सकारात्मक होता. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती.
18:39 December 08
बिपीन राऊत यांच्या निधनावर मोदींचे ट्विट
तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे मी अत्यंत दु:खी आहे, ज्यामध्ये आम्ही जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर कर्मचारी गमावले आहेत. त्यांनी अत्यंत तन्मयतेने भारताची सेवा केली. मी त्याच्या कुटूंबीयांच्या शोकात सहभागी आहे. असे ट्विट मोदींनी केले आहे.
18:31 December 08
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बिपीन रावत यांना श्रद्धांजली
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपण आपला पहिला सीडीएस जनरल बिपिन रावत यांना गमावले आहे. आपल्या शूर पुत्राच्या मृत्यूबद्दल भारत शोक करत आहे. रावत यांनी 43 वर्षे देशाची सेवा केली. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमीसाठी केलेल्या सेवेचे आम्ही सदैव ऋणी राहू.
18:27 December 08
देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं निधन
देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले. इथल्या डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात सीडीएस बिपीन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानंतर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
18:16 December 08
हेलिकॉप्टर दुर्घटना : भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे निधन
भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन याबबतची माहिती देण्यात आली आहे.
17:18 December 08
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी साडे सहा वाजता ही बैठक होणार आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.
17:07 December 08
हेलिकॉप्टर अपघातातील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
तामिळनाडूमध्ये कोसळलेले लष्करी हेलिकॉप्टरच्या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमधील 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांच्या ओळख केली जाणार आहे. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Army chopper crashe) झालं. या अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे एएनआयच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. मृत्यू झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. DNA अहवालानंतर मृतांची ओळख पटवली जाणार आहे.
16:15 December 08
तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचा मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द, राज्यपालांची घोषणा
मुंबई -राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ram Nath Kovind ) यांच्या हस्ते आज (बुधवारी) राजभवन मुंबई ( Raj Bhavan Mumbai ) येथील नवीन बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार होता. सायंकाळी हा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे व राष्ट्रपती दिल्लीकडे रवाना झाले आहेत. अशी माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे.
16:12 December 08
हेलिकॉप्टर दुर्घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत उद्या देणार निवेदन
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या विमानात भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 14 जण होते. या अपघातात आतापर्यंत 11जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत उद्या (गुरुवारी) निवेदन देणार आहेत. तसेच, संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांना संपूर्ण घडामोडींची माहिती दिली असून मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.
16:11 December 08
हेलिकॉप्टर दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
तामिळनाडूतील कोईम्बतूर आणि सुलूर येथे कोसळलेल्या लष्करी हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते. त्यात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र केआर, एल/नाईक विवेक कुमार, एल/नाईक बी साई तेजा आणि हवालदार सतपाल यांचा समावेश होता. यापैकी 11 जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तर 3 जणांवर उपचार सुरू आहेत. जखमी गंभीररित्या भाजल्याची माहिती मिळत आहे.
16:01 December 08
राजनाथ सिंह यांची बिपीन रावत यांच्या निवासस्थानी भेट
राजनाथ सिंह यांनी बिपीन रावत यांच्या निवासस्थानी भेट दिली. राजनाथसिंह पाच मिनिटे रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होते. तेथून ते संसदेकडे निघाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संसदेत निवेदन देणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघाताबाबत माहिती देणार आहेत. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उटीजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे.
15:35 December 08
हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी पाच जणांचा मृत्यू - तामिळनाडूचे वनमंत्री
चेन्नई - मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मी हेलिकॉप्टर दुर्घटनास्थळी पोहोचलो आहे. विमानातील 14 जणांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती तामिळनाडूचे वनमंत्री के रामचंद्रन यांनी दिली आहे.
15:07 December 08
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन घटनास्थळाला देणार भेट..
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आज संध्याकाळी चेन्नई विमानतळावरून कोईम्बतूर जातील. नंतर ते निलगिरीला जातील. कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान लष्करी हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनास्थळाला भेट देतील. सीडीएस जनरल बिपीन रावत आणि इतरांवर उच्चस्तरीय वैद्यकीय उपचार करा; तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे आरोग्य सचिवांना आदेश
15:05 December 08
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हेलिकॉप्टर अपघाताबाबत पंतप्रधान मोदींना दिली माहिती
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हेलिकॉप्टर अपघाताबाबत पंतप्रधान मोदींना माहिती दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात संसदेत निवेदन देणार आहेत.
15:03 December 08
हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर भारतीय हवाई दलाचे स्पष्टीकरण
IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर सुलूरहून वेलिंग्टनसाठी हवेत उड्डाण केले होते. विमानात चालक दलासह 14 लोक होते असे भारतीय हवाई दलाचे सांगितले आहे.
15:00 December 08
हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 14 जण प्रवास करत होते, चार जणांचे मृतदेह मिळाले
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडली. तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे खराब वातावरणामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत आणि त्यांची पत्नीही प्रवास करत होती असं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. या सर्वांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. इतरांचा शोध घेण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमधून एकूण 14 जण प्रवास करत होते.
14:43 December 08
तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बड्या लष्करी अधिकाऱ्यांसह बिपीन रावतही जखमी?
नवी दिल्ली - तामिळनाडूत कुन्नूरच्या वेलिंगटन आर्मी सेंटर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमधील (ArmyHelicopterCrash) दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी होते. त्यांचा तपास सुरू आहे. सीडीएस बिपीन रावत (cds bipin rawat chopper crash in ooty), त्यांची पत्नी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून (HelicopterCrash) प्रवास करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दुर्घनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितले जात आहे.