इंदौर India vs Australia 2nd ODI :भारतानं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 33 षटकांत 317 धावांचे आव्हान होतं. पण भारतीय गोलंदाजांनी कांगारूंना 217 धावांत गुंडाळलं. भारतानं हा सामना 99 धावांनी जिंकलाय. भारताकडून अश्विननं 3, जडेजानं 3 बळी घेतले. त्यांना प्रसिद्ध कृष्णानं 2, शमीनं 1 बळी घेत चांगली साथ दिली. कांगारूंकडून एबॉटनं 54 तर, वॉर्नरने 53 धावा केल्या.
कांगारूंना 213 धावांतच गुंडाळलं : या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतानं 50 षटकांत 5 गडी गमावून 399 धावा केल्या. मात्र, पावसामुळं ऑस्ट्रेलियाच्या डावात अडथळा निर्माण झाला. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार 33 षटकांत 317 धावांचं लक्ष्य मिळालं. यानंतर कांगारूंचा डाव 28.2 षटकांत 213 धावांतच गुंडाळला.
भारताच्या 50 षटकांत 5 बाद 399 धावा : तत्पूर्वी, भारतानं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 399 धावा केल्या होत्या. भारताकडून श्रेयस अय्यरनं 105, शुभमन गिलनं 104 धावा केल्या. या दोघांशिवाय सूर्यकुमार यादवनं नाबाद 72 धावा केल्या. कर्णधार केएल राहुलनं 52 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान अष्टपैलू कॅमेरून ग्रीननं 2 बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाला 317 धावांचं लक्ष्य :सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी कांगारूंसमोर 400 धावांचे लक्ष्य होतं. मात्र पावसानं मध्यंतरी सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळं डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 33 षटकांत 317 धावांचं लक्ष्य मिळालं. प्रत्युत्तरात संपूर्ण संघ अवघ्या 217 धावांत गारद झाला. संघाकडून शॉन ॲबॉटनं 54, डेव्हिड वॉर्नरनं 53 धावा केल्या. भारताकडून अश्विन, जडेजानं प्रत्येकी 3 बळी घेतले. कृष्णाला २ बळी मिळाले.
इंदूरमध्ये भारताचा हा सलग सातवा विजय :इंदूरमध्ये भारताचा हा सलग सातवा विजय आहे. 2006 मध्ये, भारत प्रथमच येथे एकदिवसीय सामना खेळला. सात वनडे सामन्यांमध्ये भारताला कधीही पराभवाचा सामना करावा लागला नाही. दरम्यान, इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात विजय मिळालाय. 2017 मध्ये टीम इंडियानं कांगारूंचा 5 गडी राखून पराभव केला होता.
सूर्याचं सलग दुसरं अर्धशतक :सूर्यकुमार यादवने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. सूर्याचे हे चौथे एकदिवसीय अर्धशतक आहे. त्याने 72 धावांची नाबाद खेळी केली. त्याने 37 चेंडूत 194.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. सूर्याच्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.