नवी दिल्ली India Sri Lanka Ferry Service :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ ऑक्टोबर) भारत आणि श्रीलंकेदरम्यान बहुप्रतिक्षित प्रवासी फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. जवळपास ४० वर्षांनंतर दोन देशांदरम्यान ही सेवा सुरू झाली. या बोटीचा प्रवास तामिळनाडूमधील नागापट्टिनम येथे सुरू होणार असून तो श्रीलंकेतील जाफना येथील कानकेसंथुराई येथे संपेल. विशेष म्हणजे हा प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण होणार आहे. या सेवेनं दोन देशांमधील लोकांचा संपर्क वाढेल, अशी आशा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्ती केली आहे. जाणून घ्या याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी...
ही सेवा का थांबली होती : भारत आणि श्रीलंका यांच्यातील भौगोलिक जवळीक लक्षात घेता, ही सागरी सेवा पारंपारिकपणे दोन देशांमधील कनेक्टिव्हिटीचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. या सेवेमुळे व्यापार आणि वस्तूंची वाहतूक सुलभ होते. परंतु श्रीलंकेतील गृहयुद्धामुळं ही सेवा चाळीस वर्ष थांबली होती. सुरक्षेच्या कारणास्तव १९८० च्या दशकात भारत आणि श्रीलंका दरम्यानची सागरी सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर, मे २०११ मध्ये तुतिकोरिन (तामिळनाडू) आणि कोलंबो (श्रीलंका) दरम्यान सेवा सुरू करण्यात आली. तथापि, व्यावसायिक व्यवहार्यतेच्या अभावामुळं नोव्हेंबर २०११ मध्ये ही सेवा पुन्हा बंद करण्यात आली.
'चेरियापानी' जहाजाचं वैशिष्ट्य : ही सागरी सेवा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) द्वारे चालवली जाईल. तामिळनाडूहून श्रीलंकेला अवघ्या तीन तासांत घेऊन जाणाऱ्या क्रूझचं नाव आहे 'चेरियापानी'. या जहाजात १५० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असून ते पूर्णपणे वातानुकूलित आहे. मात्र, ही फेरी सेवा केवळ १० दिवस चालणार असून त्यानंतर ती बंद करण्यात येईल. ईशान्य मान्सूनमुळे बंगालच्या उपसागरात वादळ येण्याची शक्यता असल्यानं, नागापट्टिनम आणि श्रीलंका दरम्यानची ही सेवा मार्च २०२४ पर्यंत बंद राहिल.