नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींविरोधातील वादग्रस्त वक्तव्य मालदीवला महागात पडलंय. 8 जानेवारीला भारत सरकारनं मालदीवच्या राजदूतांना बोलावणं धाडलंय. त्यानंतर मालदीवचे राजदूत इब्राहिम साहिब भारतीय परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले. दुसरीकडे, भारतीय ट्रॅव्हल एजन्सींनीही मालदीवची उड्डाणं रद्द करण्याची घोषणा केली आहे.
मालदीव सरकारचं निवेदन : मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हा वाद सातत्यानं वाढतोय. भारतानं हे प्रकरण मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारकडे मांडलं. त्यानंतर माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली होती. भारताच्या आक्षेपानंतर मालदीव सरकारनं एक निवेदन जारी केलं. "हे मंत्र्यांचं वैयक्तिक मत आहे. या टिप्पणीशी मालदीव सरकारचा काहीही संबंध नाही", असं या निवेदनात म्हटलंय.
काय आहे प्रकरण : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालदीव दौऱ्यादरम्यान हा वाद सुरू झाला. मोदींनी त्यांच्या मालदीव दौऱ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनी भारतीयांना आवाहन केलं हे ठिकाण खूप सुंदर आहे. या बेटाला भेट देण्याची योजना आखा. त्यानंतर मालदीव सरकारच्या मंत्री मरियम शिउना यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य करून वादाला तोंड फोडलं. मात्र यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यांनी आपली पोस्ट हटवली. या वादानंतर मालदीव सरकारनं मंत्री मरियम शिउना यांच्यासह तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून निलंबित केलं आहे.
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया : या वादानंतर सलमान खान, कंगना रणौत, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर यांसारख्या स्टार्सनी मालदीवचा निषेध नोंदवला. त्यांनी चाहत्यांना भारतातील पर्यटन स्थळांना भेट देण्याचं आवाहन केलंय. गेल्या दोन दिवसांत अनेक भारतीयांनी त्यांच्या मालदीवच्या ट्रीप रद्द केल्या आहेत. सोशल मीडियावर या प्रकरणाचे तीव्र प्रतिसाद उमटले. इंटरनेटवर #BoycottMaldives #exploreindianislands यांसारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
हे वाचलंत का :
- मालदीव प्रकरणावरून भारतीय भडकले; अनेकांनी रद्द केला मालदीव दौरा, सेलिब्रिटींनीही केला निषेध
- भारतीयांबाबतच्या वादग्रस्त पोस्टनंतर मालदीव बॅकफूटवर, सरकारनं जारी केलं निवेदन
- सोशल मीडियावर #Boycott Maldives ट्रेंड का होतंय? मोदींच्या लक्षद्वीप पोस्टचा काय संबंध?