नवी दिल्लीIndia Canada Row :कॅनडातील खलिस्तानी फुटीरतावाद्यांच्या हत्येबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्थ नसल्याचं भारतानं गुरुवारी सांगितलं. जस्टिन ट्रूडो यांनी केलेले आरोप "राजकीयदृष्ट्या प्रेरित" असल्याचंही भारतानं म्हटलंय. परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, कॅनडानं हरदीप सिंग निज्जर प्रकरणावर भारतासोबत कोणतीही विशिष्ट माहिती शेअर केलेली नाही. जूनमध्ये निज्जरच्या हत्येवरून भारत, कॅनडात राजनैतिक वाद सुरूच होता. फुटीरतावादी नेत्याच्या हत्येमध्ये भारतीय दलालांचा सहभाग असल्याचं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले आहेत.
भारत व्हिसा प्रक्रिया करण्यास अक्षम :कॅनडासोबतच्या राजनैतिक वादावर सरकारनं आपली भूमिका प्रमुख सहयोगी देशांना कळवली आहे का, असं विचारलं असता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारतानं आपली भूमिका सर्वांसमोर ठेवली आहे. सुरक्षेच्या मुद्द्यांमुळं कॅनडातील भारतीय उच्चायुक्त, वाणिज्य दूतावास व्हिसा अर्जावर प्रक्रिया करण्यास तात्पुरतं अक्षम असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कॅनडासाठी व्हिसा सेवा स्थगित : तत्पूर्वी, भारतानं कॅनडासाठी व्हिसा सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी जूनमध्ये खलिस्तानी फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा सहभाग असल्याच्या आरोपानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडत असताना हे पाऊल उचलण्यात आलं आहे. सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतानं कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित केल्याचं सूत्रांनी सांगितलं.