नवी दिल्ली Brij Bhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती महासंघानं कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यकारिणीची बैठक बोलावली. तसंच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं तातडीनं आयोजन केल्याप्रकरणी केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. भारतीय महासंघानं या स्पर्धेचं आयोजन करताना नियमांचं पालन न केल्याचा ठपका क्रिडा मंत्रालयानं ठेवला आहे. तसंच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मतदारसंघातील नंदिनी नगरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्यानं साक्षी मलिकसह अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयानं ही कारवाई केली.
आरोप-प्रत्यारोप पुन्हा सुरू : महिला कुस्तीपटू तसंच कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. आता या वादात सरकारनंही हस्तक्षेप केला असून, ब्रिजभूषण शरण सिंह यांना जोरदार धक्का दिला आहे. रविवारी क्रीडा मंत्रालयानं 'डब्ल्यूएफआय'चे (भारतीय कुस्ती संघ) नवे अध्यक्ष संजय सिंहसह त्यांची कार्यकारिणी बरखास्त केलीय. त्यामुळं कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह तसंच भारतीय कुस्तीपटूंमध्ये आरोप-प्रत्यारोप पुन्हा सुरू झाले आहेत.
माझा कुस्तीशी संबंध नाही : यावेळी ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक झालीय. त्यानंतर संजय सिंह यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. संजय सिंह हे माझे नातेवाईक नाहीत. आम्ही दोघे वेगवेगळ्या समाजातून आलो आहोत. या संदर्भात जुन्या समितीनं एक निर्णय घेतला. अंडर-20, अंडर-15 राष्ट्रीय स्पर्धांबाबतचं सत्र 31 डिसेंबरला संपणार होतं. त्यानंतर खेळाडूंची निवड केल्यास एक वर्ष वाया जाईल. यामुळं महासंघाच्या सर्व सदस्यांनी मिळून हा निर्णय घेतला. कोणत्याही परिस्थितीत खेळाचं वातावरण सुरू व्हावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. आता माझा कुस्तीशी संबंध नाहीय. आता सरकारशी बोलून कायदेशीर प्रक्रियेनुसार काम करायचं आहे. त्याबाबत कुस्ती संघाचे लोक निर्णय घेतील. माझ्याकडं अजून खूप काम आहे. आता जे काही घडतंय त्याच्याशी माझा काही संबंध नाही.