महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वडिलांच्या मारेकऱ्यांविषयी द्वेष नाही, मी त्यांना माफ केलं - राहुल गांधी - पुद्दुचेरीत काँग्रेसचे सरकार अल्पमतात

काँग्रेस नेते राहुल गांधी पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर आहेत. वडिलांच्या मारेकऱ्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांविषयी आपल्या मनात द्वेष नसून मी त्यांना माफ केलं. माझे वडिल माझ्यामध्ये जिवंत आहेत. माझ्या माध्यमातून तेच तुमच्याशी संवाद साधत आहे, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी
राहुल गांधी

By

Published : Feb 17, 2021, 8:37 PM IST

पुद्दुचेरी -येत्या काही महिन्यात पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींनी भारतीदासन शासकीय महिला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थींनीने त्यांना राजीव गांधी यांच्या मृत्यूबाबत प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, माझा कोणावर राग किंवा द्वेष नाही. मी त्यांना माफ केलं.

‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ ईलम’ (एलटीटीई) संघटनेने तुमच्या वडिलांची हत्या केली. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय भावना आहेत, असा सवाल सरकारी महिला महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीने राहुल गांधींना केला. '1991 मध्ये वडिलांची हत्या झाली. या घटनेने खूप दु:ख झालं. शरीरातून कोणीतरी आपलं हृदय काढून घेत असल्याची ती भावना होती. तो काळ माझ्यासाठी खूप कठिण होता. मला खूप वेदना झाल्या. माझा कोणावर राग किंवा द्वेष नाही. मी त्यांना माफ केलं. माझे वडिल माझ्यामध्ये जिवंत आहेत. माझ्या माध्यमातून तेच तुमच्याशी संवाद साधत आहे', असे उत्तर राहुल गांधींनी दिले.

राजीव गांधी हत्याकांड -

राजीव गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. श्रीलंकेतील तामिळ दहशतवाद संपवण्यासाठी त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठवली होती. त्याच तामिळ दहशतवाद्यांनी 21 मे, 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे महिला सुसाईड बॉम्बरच्या साहाय्याने राजीव गांधी यांची हत्या केली होती. या हत्याकांडाचा सूत्रधार असलेला प्रभाकरन याचा 2009-10मध्ये श्रीलंकन सैन्याने खात्मा केला होता. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला होता.

पुद्दुचेरीत काँग्रेसचे सरकार अल्पमतात -

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये चार आमदारांनी दिलेला राजीनामा आणि एक आमदार अयोग्य घोषित झाल्याने विधानसभेमध्ये काँग्रेस नेते व्ही. नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत गमावले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पुद्दुचेरीचा दौरा आखला. 33 सदस्य असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत आता काँग्रेसकडे केवळ 14 आमदार राहिले आहेत. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांची नायब राज्यपाल पदावरुन अचानक उचलबांगडी करण्यात आली आहे. तेलंगणाचे राज्यपाल तिमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे पद्दुचेरीचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. अल्पमतात आलेलं काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी राहुल गांधी कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. तसेच विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसची सहकारी असलेल्या डीएमकेने 4 जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details