नवी दिल्ली -भारत आणि पाकिस्तान चांगले मित्र बनताना पाहण्याचं माझं स्वप्न आहे, असे नोबेल शांतता पुरस्कार विजेता मलाला युसुफझाई हीने सांगितले. 14 व्या जयपूर साहित्य महोत्सवाच्या (JLF) समारोपाला मलाला यूसुफजईने व्हिडिओ कॉन्फरेन्सच्या माध्यमातून हजेरी लावली होती. यावेळी तीने आपलं पुस्तक 'आय एम मलाला: द स्टोरी ऑफ द गर्ल हू स्टूड अप फॉर एजुकेशन अॅन्ड शॉट बाय द तालिबान' या पुस्तकाविषयी आपले विचार मांडले.
समारोप महोत्सवात तीने भारत-पाकिस्तान संबंधावर भाष्य केलं. तुम्ही भारतीय आहात आणि मी पाकिस्तानी आहे. आपण पूर्णपणे ठीक आहोत. मग आपल्यात हा द्वेष का निर्माण झाला आहे? , असा सवाल तीने केला. सीमा विभाजन करून 'फोडा आणि राज्य करा' ही नीती येथून पुढे चालणार नाही. कारण आपल्या सर्वांना शांततेत जगायचं आहे, असे ती म्हणाले.
दोन्ही देशातील अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्याच्या गरजेवर मलालाने भर दिला. तसेच भारतातील काही भागात इंटरनेट सेवेवर आणलेली बंदी आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अटकेवरही तीने भाष्य केलं. अल्पसंख्याकांना जगभरात धोका असून त्यांचे संरक्षण प्रत्येक देशामध्ये करणे गरजेचे आहे. पाकिस्तानमधील, भारतातील किंवा इतर कोणत्याती देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण मिळणं आवश्यक आहे. अल्पसंख्यांकांना संरक्षण हे धर्माशी नाही, तर मानवी हक्कांशी संबंधित असून ते गांभीर्याने घ्यायला हवं, असेही ती म्हणाली.
भारत आणि पाकिस्तानचा खरा शत्रू हा गरीबी, भेदभाव आणि असमानता आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी एकमेकांशी नाही. तर एकत्र येवून या अदृश्य शत्रूंशी लढायला हवं, असेही तीने म्हटलं. भारत आणि पाकिस्तान चांगले मित्र बनताना पाहण्याचं माझं स्वप्न आहे. जेणेकरून आपण एकमेकांच्या देशात जाऊ शकू. तुम्ही पाकिस्तानी नाटके पाहणे सुरू ठेवू शकता, तर आम्ही बॉलिवूड चित्रपट पाहू शकू. तसेच आपण क्रिकेट सामन्यांचा आनंद घेऊ शकतो, अशी इच्छा तीने व्यक्त केली.