बीजापूर - छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 22 जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. या हल्लाने पुन्हा एकदा देश हादरला आहे. हल्ल्यानंतर सरकारी पातळीवर वेगाने घडामोडी सुरू झाल्या असून गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. राज्य पोलीस बीजापूर नक्षली हल्ल्याची संपूर्ण रिपोर्ट केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सादर करणार आहे.
नक्षलवाद मुळातून संपवणार आहे. लढाई आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहचली आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मी आश्वस्त करतो, जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अमित शाह म्हणाले. तसेच आज गृहमंत्री बीजापूर येथे झालेल्या चकमकीच्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत आणि जखमी जवानांचीही ते भेट घेणार आहेत.
नक्षलवाद्यांनी एका जवानाला ठेवले ओलीस
नक्षलवाद्यांनी एका जवानाला ओलीस ठेवल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित जवान हा जम्मू काश्मीरमधील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबीयांनी जवानाच्या सुटकेच मागणी केली आहे. योग्य वेळ आल्यास आम्ही जवानांना सोडू असे नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. ओलीस ठेवलेल्या जवानाचे नाव राकेश्वर सिंह मनहास आहे. राकेश्वर सिंह मनहास हे कोब्रा बटालियनमध्ये होते. राकेश्वर सिंह मनहास यांना एक वर्षाची मुलगी आहे. गेल्या दहा वर्षांपासून राकेश्वर सुरक्षा दलात आहेत.