नवी दिल्ली Hike in Commercial LPG Cylinder : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना महागाईचा झटका बसलाय. तेल कंपन्यांकडून व्यावसायिक LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. यानूसार आजपासून व्यावसायिक वापराच्या LPG च्या दरात मोठी वाढ झालीय. १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरसाठी आता तब्बल २०९ रुपये जादा द्यावे लागणार आहेत.
बाहेर खाणं-पिणं होऊ शकतं महाग : मागील महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली होती. सप्टेंबर 2023 मध्ये तेल कंपन्यांनी घरगुती तसंच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात केली होती. गेल्या महिन्यात 19 किलोचे सिलेंडर 158 रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र आता महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी दरवाढ करुन व्यावसायिकांना मोठा झटका दिलाय. या दरवाढीचा परिणाम हॉटेल-रेस्टॉरंट चालकांवर होणार असून परिणामी बाहेर खाणं-पिणं महाग होऊ शकतं.
कोणत्या शहरात किती दर :आजपासून लागू झालेल्या नव्या दरानुसार, व्यावसायिक सिलिंडरसाठी आता राजधानी दिल्लीत 1522.50 रुपयांऐवजी 1761.50 रुपये मोजावे लागतील. तर आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक वापरच्या सिलिंडरची किंमत 1482 रुपयांवरुन 1684 रुपये झालीय. कोलकाता येथे 1636 रुपयांऐवजी 1839.50 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चेन्नईत आता व्यावसायिक LPG साठी 1898 रुपये मोजावे लागतील.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती जैसै थे :मागील महिन्यातच केंद्र सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी मोठी कपात करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. यानंतर आज घरगुती LPG च्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेल कंपन्यांनी आज केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत बदल केले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींत कोणतीही वाढ केली नाही यामुळं सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. दिल्लीत 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये तर मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.
हवाई प्रवासही महागला : सरकारनं आजपासून जेट इंधनाच्या म्हणजेच एटीएफच्या किमतीत (ATF Price) 5 टक्क्यांनी वाढ केलीय. या वाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत ATF ची किंमत 5,779.84 रुपये प्रति किलोलीटरने वाढून 1,18,199.17 रुपये प्रति किलोलीटर झालीय. यामुळं आगामी काळात हवाई प्रवास महाग होऊ शकतो. यापूर्वी सरकारनं ATF ची किंमत 1 सप्टेंबर रोजी 14.1 टक्के म्हणजेच 13,911.07 रुपये प्रति किलोलीटरनं आणि ऑगस्टमध्ये 8.5 टक्के म्हणजेच 7,728 रुपये प्रति किलोलीटरनं वाढवली होती.
हेही वाचा :
- Rule Change From १st September २०२३ : देशात आजपासून 'हे' मोठे बदल; सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार परिणाम
- LPG Cylinder Price : गृहिणींसाठी आनंदाची बातमी; सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी स्वस्त
- Commercial LPG Prices : व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती झाल्या स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर