नवी दिल्ली :देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे लोकांचे हाल होते आहेत. यूपी-बिहारमध्ये उष्णतेमुळे जवळपास 100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेमुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. अशा स्थितीत या राज्यांमध्ये केवळ पाऊसच या उष्णतेपासून काहीसा दिलासा देऊ शकतो, मात्र अद्याप मान्सून या राज्यांमध्ये पोहोचलेला नाही.
यूपीच्या बलियामध्ये 44 ठार :यूपीच्या बलियामध्ये गेल्या 50 तासांत 44 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 400 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, मृत्यूची वेगवेगळी कारणे आहेत, ज्यापैकी अति उष्णता एक घटक असू शकतो. उत्तर प्रदेश तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त आहे. बहुतेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. बलियामध्ये शनिवारी 43 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले होते. जे सामान्यपेक्षा पाच अंशांनी जास्त होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बलियामध्ये १६ जून रोजी ४२.२ अंश सेल्सिअस, १५ जून रोजी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
बिहारमध्ये उष्णतेमुळे 27 जणांचा मृत्यू :बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे 27 जणांचा मृत्यू झाला आहे, तर बहुतांश ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. येथेही उन्हाच्या तडाख्याने लोकांचे हाल होत आहेत. शनिवारी पाटण्याचे कमाल तापमान ४४.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शेखपुरा राज्यात ४५.१ अंश सेल्सिअस तापमानात सर्वात उष्ण ठरले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूपी-बिहारमध्ये उष्णतेमुळे सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला आहे.
ओडिशामध्ये पहिला मृत्यू :ओडिशामध्ये उष्णतेच्या लाटेमुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. ओडिशातील सतत उष्ण, दमट हवामानादरम्यान, राज्य सरकारने उष्णतेच्या लाटेशी संबंधित पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मृतांच्या कुटुंबासाठी 50,000 रुपयांची एक्स-ग्रेशिया मंजूर केली आहे अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने माहिती दिली.