मुंबई - देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटमुळे चिंता मात्र कायम आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस नंतर आता कप्पा व्हेरिएंट समोर आला आहे. राजस्थानमध्ये कप्पा व्हेरिएंटचे आतापर्यंत ११ रुग्ण आढळून आले आहे. यामुळे राजस्थानमध्ये खळबळ माजली आहे.
राजस्थानचे आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी सांगितलं की, आतापर्यंत राज्यात कप्पा व्हेरिएंटचे ११ रुग्ण आढळून आले आहेत. यात जयपूर आणि अलवर येथील प्रत्येकी ४-४ रुग्णांचा समावेश आहे. तर दोन रुग्ण बाडमेर आणि एक भीलवाडा येथील आहे.
कप्पा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने कमी घातक असल्याचे डॉ. रघु शर्मा यानी सांगितलं. तरी देखील त्यांनी कोविडच्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे.
दरम्यान, कोरोनाचा कप्पा व्हेरिएंट (बी.१.१६७.१) भारतात पहिल्यांदा ऑक्टोबर २०२० मध्ये आढळून आला होता. हा कोरोना व्हायरसचा एक डबल म्यूटेंट स्ट्रेन आहे. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत कप्पा व्हेरिएंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वृत्त आहे.