हाथरस: गोवर्धन परिक्रमा करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सादाबाद रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री घडला असून यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. सर्व भाविक ट्रॅक्टरच्या ट्रॅलीमध्ये बसून प्रवास करत होते.
असा घडला अपघात:मिळालेल्या माहितीनुसार, एटा जिल्ह्यात असलेल्या जलेसर गावातील काही लोक ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसून गोवर्धन परिक्रमासाठी जात होते. या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये 50 ते 60 जण बसलेले होते. हे भाविक एकमेकांचे नातेवाईक आहेत. भाविकांचे ट्रॅक्टर जेव्हा सहपऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सादाबादच्या रस्त्यावर आले तेव्हा समोरून येणाऱ्या डंपरने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 16 जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही जखमींना सादाबाद येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर 3 जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सादाबादच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी 10 जणांना आग्रा येथील मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. तर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींमधून एका 16 वर्षीय पवन कुमार नावाच्या मुलाला अलीगढ मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. सुलतान सिंग आणि त्यांची पत्नी रामवती यांच्यावर हाथरस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.