डेहराडून : हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर सुशील कुमार क्रिकेटपटू ऋषभ पंतसाठी देवदूत ठरला आहे. आज सकाळी ऋषभ पंतची मर्सिडीज नरसन सीमेजवळ दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. (Rishabh Pant car accident) यानंतर ऋषभ पंतच्या कारला आग लागली. कारची काच फोडून ऋषभ पंतने आपला जीव वाचवला. दरम्यान, समोरून येणारा हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर सुशील कुमार (Haryana Roadways Driver Sushil Kumar) याला जळणारी कार दिसली. त्याने घाईघाईत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर चालकाने ऋषभ पंतला जळत्या कारपासून दूर नेले. (rishabh pant after accident)
बस हरिद्वारहून दिल्लीला जात होती :हरिद्वारचे एसएसपी अजय सिंह यांनी सांगितले की, पहाटे 5.22 च्या सुमारास क्रिकेटर ऋषभ पंतची कार दुभाजकाला धडकल्यानंतर उलटली. त्यानंतर त्यांच्या कारला आग लागली. हरियाणा रोडवेजचा बस चालक सुशील कुमार याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच पंत याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. हरिद्वारचे एसएसपी अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला तेव्हा हरियाणा रोडवेजची बस हरिद्वारहून दिल्लीला जात होती. तेव्हा चालकाची नजर रस्त्यावर पडलेल्या भीषण कार अपघातावर पडली. हे पाहून हरियाणा रोडवेजच्या बस चालकाने वाहन बाजूला लावले. त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता 112 क्रमांकावर फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकानेच ऋषभ पंतला रुग्णालयात नेले.