बीरभूम (पश्चिम बंगाल) : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 35 पेक्षा जास्त जागा देऊन नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करा, असे आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. ते पश्चिम बंगालच्या बीरभूम येथे बोलत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना शाह म्हणाले की, बंगालच्या जनतेने राज्याच्या निवडणुकीत आम्हाला 77 जागा दिल्या आहेत. ही मोठी जबाबदारी आहे. 2024 मध्ये भाजपला सत्तेत आणा आणि ममता दीदींचे सरकार 2025 पूर्वी पडेल. तृणमूलला सत्तेतून हटवण्यासाठी भाजप हा एकमेव पर्याय आहे, असे देखील शाह यावेळी म्हणाले आहेत.
'गुन्हेगारी थांबवण्यासाठी आम्हाला सत्ता द्या' :अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, 'दीदी - भाईपोचे (ममता आणि अभिषेक) गुन्हे थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भाजपला सत्तेवर आणणे. राज्यातील बेकायदेशीर स्थलांतर, गाय तस्करी आणि भ्रष्टाचार केवळ भाजपच थांबवू शकतो. बेनिमाधव हायस्कूलच्या मैदानावर रखरखत्या उन्हात इथल्या गर्दीने बरेच काही बदलणार आहे हे सिद्ध केले आहे', असे शाह यावेळी आक्रमकपणे म्हणाले.