नवी दिल्ली : २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीमध्ये ७.३ टक्के घसरण झाल्याचे समोर आले आहे. आज (सोमवार) ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. यापूर्वी २०१९-२० या आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये ४ टक्क्यांची वाढ झालेली दिसून आली होती.
केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) ही आकडेवारी जाहीर केली. गेल्या वर्षीचा भारताचा जीडीपी हा १४५ लाख कोटी रुपये होता. तो यावर्षी कमी होऊन १३५ लाख कोटी रुपयांवर आला आहे. तसेच, जीडीपीमधील वाढ ही गेल्यावर्षीच्या तुलनेत (४.०) यावर्षी उणे ७.३ टक्के झाली असल्याचे एनएसओने स्पष्ट केले.
जीडीपी ही देशातील उत्पादित वस्तू आणि सेवांची एकूण मात्रा आहे आणि ती अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शविणारी प्रमुख सूचक आहे.
तिमाही वाढीमध्ये सुधारणा..
एकूण वर्षामध्ये जरी जीडीपीमध्ये घट दिसून आली असली, तरी २०२०-२१च्या चौथ्या तिमाहीमध्ये जीडीपीच्या स्तरात सुधारणा दिसून आली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये केवळ ०.५ टक्के वाढीची नोंद झाली होती. मात्र, तेच जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये १.६ टक्के वाढीची नोंद झाली. दरम्यान, २०२१च्या जानेवारी-मार्च या तिमाहीमध्ये चीनच्या जीडीपीमध्ये १८.३ टक्क्यांची वाढ दिसून आली.
कोविडचा अर्थव्यवस्थेवर परिणाम..
गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग ठप्प झाले होते. त्यामुळेच जीडीपीमध्ये घट दिसून आली. याची परिणीती म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेने पहिलीच तांत्रिक मंदी पाहिली. सोमवारी जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार पहिल्या (एप्रिल-जून) आणि दुसर्या (जुलै-सप्टेंबर) तिमाहीत जीडीपी अनुक्रमे 24.4 आणि 7.4 टक्क्यांनी घसरला होता. मात्र ऑक्टोबर-डिसेंबर आणि जानेवारी-मार्च या दुसऱ्या दोन तिमाहींमध्ये यात अनुक्रमे ०.५ आणि १.६ टक्क्यांची वाढ दिसून आली.
हेही वाचा :कोरोनात दिलासा : टीव्हीएस ग्रुपकडून तामिळनाडूला ८ कोटी रुपयांची मदत