नवी दिल्ली :महात्मा गांधी शांतता पुरस्कार हा जगातील महत्वाचा पुरस्कार समजला जातो. गोरखपूर येथील गीता प्रेसला 2021 सालचा गांधी शांतता पुरस्कार जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने रविवारी केली. हा पुरस्कार महात्मा गांधींच्या 125 व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने 1995 पासून सुरू केला आहे. राष्ट्रीयत्व, वंश, भाषा, जात, पंथ किंवा लिंग असा भेदभाव न करता, हा पुरस्कार देण्यात येतो.
गीता प्रेसच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांना गांधी शांतता पुरस्कार प्रदान करणे ही संस्थेने समाजसेवेत केलेल्या कार्याची पावती आहे. गीता प्रेसचे अतुलनीय योगदान मानवतेच्या सामूहिक उत्थानासाठी महत्वपूर्ण असून ते खऱ्या अर्थाने गांधीवादी जीवनाचे प्रतीक आहे. - केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय
असे आहे पुरस्काराचे स्वरुप :महात्मा गांधी शांतता पुरस्कार हा जगभरात खूप मानाचा समजला जातो. 1 कोटी रुपये, सन्मानपत्र, फलक आणि उत्कृष्ट पारंपरिक हस्तकलेचे स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या अगोदर इस्रो, रामकृष्ण मिशन, ग्रामीण बँक ऑफ बांग्लादेश, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, अक्षय पत्र, बेंगळुरू, एकल अभियान ट्रस्ट भारत आणि सुलभ इंटरनॅशनल, नवी दिल्ली या संस्थांना महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या नेत्यांना गौरवण्यात आले महात्मा गांधी शांतता पुरस्काराने :दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती डॉ. नेल्सन मंडेला, टांझानियाचे माजी राष्ट्रपती डॉ. ज्युलियस न्येरेरे, श्रीलंकेतील सर्वोदय श्रमदान चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ए. टी. अरियारत्ने, बाबा आमटे, डॉ. गेर्हार्ड फिशर, आयर्लंडचे जॉन ह्यूम, व्हॅक्लाव हॅवेल, आर्चबिशप डेसमंड टुटू, चंडी प्रसाद भट्ट आणि योहेई सासाकावा, अलीकडील पुरस्कार विजेत्यांमध्ये सुलतान काबूस बिन सैद अल सैद, ओमान (2019) आणि बंगबंधू शेख मुजीबुर रहमान (2020), बांगलादेश यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरींनी 18 जून रोजी सर्वानुमते गीता प्रेस, गोरखपूरची 2021 सालच्या गांधी शांतता पुरस्कारासाठी निवड केली आहे.
गीता प्रेस जगातील सर्वात मोठे प्रकाशक :गीता प्रेसची स्थापना 1923 मध्ये करण्यात आली असून गीता प्रेस हे जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे. आतापर्यंत गीता प्रेसने 16.21 कोटी श्रीमद भगवद्गीता प्रकाशीत केल्या आहेत. तर 14 भाषांमध्ये 41.7 कोटी पुस्तके प्रकाशित केली आहेत. महसूल निर्मितीसाठी संस्थेने कधीही आपल्या प्रकाशनातील जाहिरातींवर अवलंबून राहिलेले नाही. गीता प्रेस त्याच्या संलग्न संस्थांसह, जीवनाच्या उन्नतीसाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करत आहे.
गीता प्रेसच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण :शांतता आणि सामाजिक सलोखा राखून गांधीवादी आदर्शांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता प्रेसच्या योगदानाचे स्मरण केले. गीता प्रेसच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांना गांधी शांतता पुरस्कार प्रदान करणे ही संस्थेने समाजसेवेत केलेल्या कार्याची पावती असल्याचे स्पष्ट केले. गीता प्रेसचे अतुलनीय योगदान मानवतेच्या सामूहिक उत्थानासाठी महत्वपूर्ण असून ते खऱ्या अर्थाने गांधीवादी जीवनाचे प्रतीक असल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.