सिवान (बिहार) : नागपूर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नागपूर पोलीस थेट बिहारच्या सिवान येथे पोहोचले आहेत. या पोलिस पथकाने सिवानच्या आसी नगर येथे एका तरुणाची चौकशी केली आहे, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या टीमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पोलीस पथकाने तूर्तास यासंबंधी आणखी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. बिहारमधील या तरुणावर पंजाब नॅशनल बँकेची 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण :नागपूरचे ऑटो व्यावसायिक प्रकाश जैन यांचा हवाला देत काही लोकांनी नागपूरच्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेला फोन केला. त्यांनी त्यांच्या नावाने वेगवेगळ्या खात्यांमध्ये 16 लाख रुपये मागवले. नंतर कळले की प्रकाश जैन यांनी पैशांची मागणी केलीच नव्हती. या गुन्हेगारांनी कट रचून बँकेतून पैसे मागून बॅंकेची फसवणूक केली होती. त्यानंतर बँकेची 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूरच्या राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याचे पोलीस बिहारच्या सिवान जिल्ह्यातील दोन तरुणांची ओळख पटवण्यासाठी बिहारला पोहोचले. या तरुणांच्या खात्यावर सुमारे 10 ते 11 लाख रुपये ट्रान्सफर झाले आहेत.