नवी दिल्ली :पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने बालाकोट हवाई हल्ले 26 फेब्रुवारी 2019 रोजी केले होते. आज ‘ऑपरेशन बंदर’ नावाने हवाई दलाने केलेल्या या यशस्वी हवाई हल्ल्याला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. १४ फेब्रुवारी 2019 च्या पहाटे, जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर आत्मघाती बॉम्बरने हल्ला केल्यानंतर 12 दिवसांनी भारताने हा हवाई हल्ला केला होता. 1971 च्या भारत-पाक युद्धानंतर पहिल्यांदाच भारताने सीमापार करून असा हवाई हल्ला केला.
बालाकोट हवाई हल्ले :14 फेब्रुवारी 2019 रोजी, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 जवानांवर हल्ला केला त्यात ते शहीद झाले. प्रत्युत्तरादाखल भारतीय वायुसेनेने बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचे सर्वात मोठे प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केले. आयएएफ मिराज 2000 लढाऊ विमानांच्या संपूर्ण ताफ्याने प्रत्युत्तरासाठी पहाटे 3.30 वाजता भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली होती. हवाई हल्ले करून सुरक्षितपणे भारतात परत येण्याच्या संपूर्ण ऑपरेशनला 'ऑपरेशन बंदर' असे सांकेतिक नाव देण्यात आले होते. गुप्तता राखण्यासाठी आणि हवाई हल्ल्यांच्या योजना बाहेर कळू नयेत यासाठी हे नाव देण्यात आले होते. भारताच्या युद्ध संस्कृतीत माकडांना नेहमीच विशेष स्थान आहे. जसे हनुमानांनी लंकेत घुसून रावणाच्या संपूर्ण लंकेचा नाश केला आणि भारत भूमीत परतले तसे हे ऑपरेशन होते, जिथे वायुसेना पाकिस्तानच्या भूमीवर घुसली आणि दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर सुरक्षित परतले.
बालाकोट हवाई हल्ले कसे केले गेले? : बालाकोट हे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एक शहर आहे. हे नियंत्रण रेषेपासून सुमारे 50 किमी अंतरावर आहे. गुप्तचर संस्थांमध्ये दहशतवादाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. हे बऱ्याच काळापासून अमेरिकन सैन्याच्या रडारवर आहे. जेथे अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनला अमेरिकन सैन्याने मारले होते. 26 फेब्रुवारी रोजी, 12 मिराज विमानांनी हवाई तळांवरून उड्डाण केले, पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश केला आणि दहशतवादी तळावर हल्ले केले. आयएएफ वैमानिकांनी पाच स्पाइस 2000 बॉम्ब टाकले, पहाटे 3:30 वाजता हे हल्ले करण्यात आले. त्यानंतर आयएएफची विमाने त्यांच्या तळांवर परतली.