New Delhi:पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांना २ वर्षांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने सोनिया गांधी यांच्याकडे याची शिफारस केली आहे. यावर सोनिया गांधी अंतिम शिक्कामोर्तब करतील. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सुनील जाखड यांनी काँग्रेसला फक्त शुभेच्छा दिल्या. ( Sunil Jakhar Suspension ) अशा स्थितीत आता ते काँग्रेसमध्ये राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारवाईपूर्वीच सुनील जाखड यांनी ट्विटद्वारे काँग्रेस हायकमांडवर निशाणा साधला आहे.
दोन वर्षंचे निलंबन - जाखड यांनी माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर टीका केली होती. तसेच, आम आदमी पक्षाकडून पंजाबमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर त्यांना पक्षाच्या पराभवासाठी जबाबदार असल्याचे म्हटले होते. जाखड यांना सध्या त्यांच्या सर्व पदांवरून हटवण्यात येणार असून, पक्षाच्या हायकमांडने शिफारस मान्य केल्यास त्यांना दोन वर्षांच्या कालावधीत पक्षात कोणतेही पद दिले जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे.
कारवाईमुळे काँग्रेसमधील कलह आणखी तीव्र - माजी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर जाखड यांना नोटीस देण्यात आली आहे. जाखड यांनी अद्याप नोटीसला उत्तर दिलेले नाही. एवढेच नाही तर हायकमांडपुढे झुकणार नाही असा संदेशही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला. मात्र, जाखड यांच्यावरील कारवाईमुळे काँग्रेसमधील कलह आणखी तीव्र होऊ शकतो. त्यांच्यासारखेच नवज्योत सिद्धू यांच्यासह अनेक नेते उघड वक्तव्ये करत आहेत.