श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये 'फिल्म टूरिझम फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड कल्चरल प्रिझर्व्हेशन' या विषयावरील पहिल्या G20 शिखर परिषदेला सोमवारी सुरुवात झाली. अनेक देशांचे प्रतिनिधी आणि अधिकारी या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी श्रीनगरला पोहचले आहे. यावेळस त्यांनी परिषदेला संबोधित करताना त्यांच्या काश्मीर आणि चित्रपटांच्या आठवणी सांगितल्या. G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी तरुण असताना काश्मीरमध्ये झालेल्या त्यांच्या भेटीची आठवण करून दिली आणि काश्मीरमधील दृश्यांशिवाय बॉलीवूड चित्रपट कसा अपूर्ण आहे हे देखील सांगितले.
'काश्मीरमध्ये चित्रपट निर्मितीसाठी भरपूर वाव' :ते म्हणाले की, मी काश्मीरला भेट दिली तेव्हा काश्मीरच्या पहलगाममध्ये एका चित्रपटाचे शूटिंग पाहण्याचे भाग्य मला मिळाले. ते पुढे म्हणाले की, काश्मीरमध्ये चित्रपट निर्मितीसाठी भरपूर वाव आहे. काश्मीरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांच्या शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटांच्या शूटिंगसाठी काश्मीरपेक्षा चांगली जागा असू शकत नाही. आम्ही येथे चित्रपटांच्या शूटिंगमध्ये मदत करू.
'काश्मीरच्या व्यक्तींचे बॉलिवूडमध्ये मोठे योगदान' : भारताच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपल्या भाषणात जम्मू आणि काश्मीरमधील अभिनेते आणि दिग्दर्शकांचे बॉलिवूडमध्ये किती मोठे योगदान आहे हे सांगितले. आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करत ते म्हणाले की, केएल सहगल, जीवन, ओमप्रकाश, राज कुमार आणि रामानंद सागर यांनी काश्मीरमध्ये चित्रपट बनवण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दिशा दिली आहे.